जान बची लाखो पाये...

By Admin | Updated: July 22, 2014 00:50 IST2014-07-22T00:50:40+5:302014-07-22T00:50:40+5:30

पोलीस ठाण्यातील दुहेरी-तिहेरी कोंडीमुळे निवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या एका हवालदाराला आपले दोन दात गमवावे लागले. प्रतापनगर पोलीस ठाण्यात घडलेल्या एका विचित्र अपघाती घटनेने शहरातील

Find millions of lives ... | जान बची लाखो पाये...

जान बची लाखो पाये...

दातावर बेतली, हवालदार गंभीर : प्रतापनगर ठाण्यात अपघात
नागपूर : पोलीस ठाण्यातील दुहेरी-तिहेरी कोंडीमुळे निवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या एका हवालदाराला आपले दोन दात गमवावे लागले. प्रतापनगर पोलीस ठाण्यात घडलेल्या एका विचित्र अपघाती घटनेने शहरातील अनेक पोलीस ठाण्यातील ‘नव्या समस्ये’वर लख्ख प्रकाशझोत टाकला आहे.
शहरात एकूण २३ पोलीस ठाणी आहेत. त्यातील अनेक पोलीस ठाण्यातील कर्मचारी तर सोडा अधिकाऱ्यांनाही बसायला पुरेशी जागा नाही. ज्याच्याकडे तक्रार नोंदवायची, गुन्हे दाखल करायचे, तपासाचा प्रगती अहवाल नोंदवायचा, तेवढ्यांनाच फक्त ठाण्यात बसण्याची सोय. त्यामुळे बाकी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आपले काम (लिखापढीचे) करण्यासाठी बसून असलेले उठण्यापर्यंतची वाट बघावी लागते. त्यामुळे अनेक कनिष्ठ अधिकारी, कर्मचारी पोलीस ठाण्याच्या आवारातच घुटमळताना दिसतात. अशीच अवस्था प्रतापनगर पोलीस ठाण्यातील आहे. येथे कर्मचारी अधिकाऱ्यांचे एकूण संख्याबळ १२० आहे. मात्र, संपूर्ण पोलीस ठाण्यात दाटीवाटीने बसवले तरी ५० पेक्षा जास्त कर्मचारी प्रतापनगर ठाण्यात बसू शकत नाहीत. ठाणेदाराला तर स्वतंत्र कक्ष आहे. मात्र, इतरांना कुठे बसवावे, हा प्रश्न रोजच सतावतो. उन्हाळा आणि हिवाळ्यात कसेबसे भागून जाते. पावसाळ्यात येथील कर्मचारी अन् कनिष्ठ अधिकाऱ्यांची मोठी कोंडी होते. ठाण्यात चक्क पावसाचे पाणी साचते. तशाही स्थितीत आपापले कर्तव्य पार पाडण्यासाठी अधिकारी, कर्मचारी धडपडत असतात. हवालदार नारायण लक्ष्मणराव इटनकर (वय ५४) अशाच प्रकारे आज दुपारी २ च्या सुमारास आपले कर्तव्य पार पाडण्यासाठी धडपडत होते. अचानक पाय घसरून धाडकन् आपटले. तोंडाच्या बळावर पडल्यामुळे त्यांना गंभीर दुखापत झाली. ठाण्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी धावपळ करीत त्यांना जवळच्याच खासगी इस्पितळात नेले. डॉक्टरांनी तातडीने उपचार केल्यामुळे इटनकर बचावले. मात्र, त्यांचा वरचा आणि खालचा प्रत्येकी एक (एकूण दोन) दात पडला. आजूबाजूचे दात खिळखिळे झाले अन् ओठांनाही जबर दुखापत झाली. या घटनेमुळे पोलीस ठाण्यातील अधिकारी- कर्मचाऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
माहिती साऱ्यांनाच, उपाययोजना नाही!
प्रतापनगर ठाण्यातील अपुरी जागा अन् जमा होणारे पावसाचे पाणी सर्वच वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिसते. मात्र, त्यावर उपाययोजना करण्याची आवश्यकता कुणालाही वाटत नाही. त्यामुळे कोंडवाड्यासारख्या जागेत वरिष्ठांचे दडपण आणि कामाचा ताण घेऊन काम करणाऱ्या कनिष्ठ अधिकारी-कर्मचाऱ्यांची तीव्र कोंडी होत आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Find millions of lives ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.