लॉकडाऊनमुळे नुकसान झेलणाऱ्या व्यापाऱ्यांना अर्थसाहाय्य द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:08 IST2021-04-20T04:08:12+5:302021-04-20T04:08:12+5:30
नागपूर : चेंबर ऑफ असाेसिएशन्स ऑफ महाराष्ट्र इंडस्ट्रीज ॲन्ड ट्रेड(कॅमिट)चे अध्यक्ष दीपेन अग्रवाल यांनी लॉकडाऊनमुळे नुकसान झेलणाऱ्या राज्यातील ठोक ...

लॉकडाऊनमुळे नुकसान झेलणाऱ्या व्यापाऱ्यांना अर्थसाहाय्य द्या
नागपूर : चेंबर ऑफ असाेसिएशन्स ऑफ महाराष्ट्र इंडस्ट्रीज ॲन्ड ट्रेड(कॅमिट)चे अध्यक्ष दीपेन अग्रवाल यांनी लॉकडाऊनमुळे नुकसान झेलणाऱ्या राज्यातील ठोक आणि किरकोळ व्यापाऱ्यांना अर्थसाहाय्यासाठी पॅकेज देण्याची मागणी राज्य सरकारकडे केली आहे. या विषयावर कॅमिटच्या पदाधिकाऱ्यांची ऑनलाईन बैठक झाली. यात ही मागणी करण्यात आली.
कॅमिटचे चेअरमन माेहन गुरनानी म्हणाले, लॉकडाऊनमुळे व्यापाऱ्यांची कंबर मोडली आहे. कार्यकारी अध्यक्ष अशाेक बाफना म्हणाले, एमएसएमईने व्यापार उभारण्यासाठी संपूर्ण रक्कम गुंतविली. आता त्यांच्याकडे काहीच शिल्लक राहिलेले नाही. कोरोनाच्या काळात आता व्यवसाय संपतो की काय, अशी भीती वाटायला लागली आहे. कॅमिटचे वरिष्ठ उपाध्यक्ष राजू राठी म्हणाले, व्यापारी मरू इच्छित नाही. अर्थसाहाय्याशिवाय त्यांनी आपला व्यापार पुन्हा उभारण्याचे प्रयत्न केले. मात्र आता सरकार आणि प्रशासनाच्या मदतीची गरज आहे. सचिव अजित काेठारी म्हणाले, व्यापारी आज अत्यंत कठीण परिस्थितीमधून जात आहेत. यामुळे राज्य सरकारने तातडीने पावले उचलून आधार द्यायला हवा. अन्यथा व्यापाऱ्यांचे दिवाळे निघाल्याशिवाय राहणार नाही. सचिव मितेश माेदी म्हणाले, कॅमिटने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन पाठवून कोरोना लाॅकडाऊनमुळे होत असलेल्या नुकसानीची भरपाई देण्याची मागणी केली आहे. यासोबतच वीजदर कपात, वेज सबसिडी, सरकारी खरेदीच्या बिलांची देयके लवकर मंजूर करणे, प्राॅपर्टी टॅक्स आदीमध्ये सूट देण्याची तसेच स्थानिक दरानुसार दुकानांचे भाडे माफ करण्यासारखे पाऊल उचलावे, असे उपाय सुचविले.
-------