कृत्रिम पायासाठी हवे आर्थिक पाठबळ

By Admin | Updated: July 4, 2014 01:17 IST2014-07-04T01:17:16+5:302014-07-04T01:17:16+5:30

खेळण्याबागडण्याच्या वयात एका अपघाताने त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली. रक्तबंबाळ झालेला पाय गुडघ्यापासून कापण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. त्यानंतर तो कापलासुद्धा. आता त्याला कुबड्यांचा आधार लागतो.

Financial support for artificial foundation | कृत्रिम पायासाठी हवे आर्थिक पाठबळ

कृत्रिम पायासाठी हवे आर्थिक पाठबळ

दुर्गेशला कुबड्यांचा आधार : समाजाच्या हातभाराने होणार उभा!
अभय लांजेवार - उमरेड
खेळण्याबागडण्याच्या वयात एका अपघाताने त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली. रक्तबंबाळ झालेला पाय गुडघ्यापासून कापण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. त्यानंतर तो कापलासुद्धा. आता त्याला कुबड्यांचा आधार लागतो. कृत्रिम पाय बसविण्याचा सल्ला डॉक्टरांनी देत त्यासाठी दोन लाखाच्या आसपास खर्च येईल, असे सांगितले. मात्र घरात अठराविश्वे दारिद्र्य... त्यातच होता तो पैसा ‘त्याच्या’ उपचारावर खर्च केला. त्यामुळे विद्यार्थीदशेत असलेल्या ‘त्याच्या’साठी कृत्रिम पाय कुठून आणणार. एवढा खर्च झेपणार का, हा प्रश्न त्याच्या कुटुंबीयांना सतावत आहे. परंतु समाजाने आर्थिक हातभार लावला तर ‘त्याला’ कृत्रिम पाय बसविणे शक्य होऊन, तो पुन्हा सर्वसामान्यांसारखा चालू शकतो.
दुर्गेश शिवशंकर ब्रम्हे (१९, रा. आसगाव, पवनी) असे या अपघातग्रस्त विद्यार्थ्याचे नाव आहे. दोन वर्षांपूर्वी १४ जून २०१२ रोजी चुलतभाऊ रोशनसोबत तो मांगली येथे जाण्यासाठी दुचाकीने निघाला. दरम्यान, समोरून येणाऱ्या ट्रॅक्टरने दुचाकीला जबर धडक दिली. दुर्गेशचा उजवा पाय नांगरात अडकला आणि तो काही अंतरावर फरफटत गेला. रक्तबंबाळ झालेल्या दुर्गेशसह रोशनने मदतीसाठी याचना केली. बऱ्याच वेळेनंतर दोघांनाही पवनी आणि नंतर दुर्गेशला नागपूरच्या खाजगी हॉस्पिटलमध्ये भरती केले. तेथून मेडिकल, सुपर स्पेशालिटी येथे हलवून तुटलेल्या नसवर शस्त्रक्रिया करण्यात आली. परंतु त्याचा काहीच उपयोग झाला नाही. अखेर १७ दिवसानंतर मेडिकलमध्ये भरती केल्यावर गुडघ्यापासून पाय कापावा लागला.
या अपघातानंतर त्याला कुबड्यांचा आधार घ्यावा लागत आहे. दुर्गेशला लागलेल्या कुबड्या निघू शकतात, त्यासाठी साधारणत: दोन लाख रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. परंतु घरची परिस्थिती बिकट असल्याने एवढे पैसे आणायचे कुठून, हा प्रश्न ब्रम्हे कुटुंबीयांना पडला आहे.
वडील शिवशंकर हे खेडोपाडी जाऊन कपबशा विक्रीचा व्यवसाय करतात. आई धुणीभांडीच्या कामास जाते. लहान भाऊ आशिष आणि बहीण कल्याणीचेही शिक्षण सुरू आहे. थोडा फार पैसा हाती आला तेव्हा दुर्गानगरी परसोडी (वॉर्ड २३) येथे कसेबसे घर उभारले.
नंतर अपघात होताच बांधकाम अपूर्णावस्थेत ठेवत असलेला पैसा दुर्गेशच्या उपचारासाठी लावला. दुर्गेश हा सध्या उमरेड पॉलिटेक्निकमध्ये द्वितीय वर्षाला आहे. त्याचे वडील दररोज दुचाकीने त्याला कॉलेजमध्ये सोडतात.

Web Title: Financial support for artificial foundation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.