लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बनावट कागदपत्रांच्या आधारे विद्यार्थ्यांची पटसंख्या जास्त दाखवून शासनाचे लाखोंचे अनुदान हडपणाऱ्या संस्था सचिव व त्याचा मुलगा तसेच या दोघांना मदत करणाऱ्या विविध पदावरील मुख्याध्यापक, अधिकाऱ्यांसह १३ जणांविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी, २६ जूनला गुन्हा दाखल केला. या कारवाईमुळे बनावट कागदपत्रांचा वापर करून शासनाचे अनुदान हडपणाऱ्या संस्थाचालकांमध्ये प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे.ग्रामोद्धार विद्याप्रसारक शिक्षण संस्था हिंगणाद्वारे उखळी गावात अहिल्यादेवी होळकर अनुदानित आदिवासी प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक आश्रमशाळा चालविण्यात येते. श्रीकृष्ण मते हे या संस्थेचे सर्वेसर्वा म्हणून ओळखले जातात. मते यांनी आश्रमशाळेच्या प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक दामोदर हारगुडे, अमोल पंचबुद्धे तसेच संस्थेत कनिष्ठ लिपिक म्हणून कागदोपत्री कामाला असलेला श्रीकृष्ण मते यांचा मुलगा मुकेश मते यांनी संगनमत करून २०१० ते २०१६ या कालावधीत शासनाचे जास्तीत जास्त अनुदान लाटण्यासाठी बनावट कागदपत्रे तयार केली. त्या आधारे आश्रमशाळेतील निवासी विद्यार्थ्यांची जास्त संख्या दाखवून उपरोक्त कालावधीत शासनाकडून ४४ लाख ९९ हजार ६१३ रुपयांचे जास्तीचे अनुदान हडपले. विशेष म्हणजे, त्या कालावधीत आश्रमशाळेला भेट देऊन चौकशी करणारे अधिकारी विजय बेले, पी. एन. रघुर्ते, टी. एस. तिडके, डी. एस. निवेकर, आर. बी मेश्राम, नीलेश राठोड, व्ही. वाय. भिवगडे, एच. एम. मडावी आणि आर. के. नंदेश्वर यांनी या गैरप्रकारात अर्थपूर्ण सहभाग घेऊन सरकारला गंडा घालण्यास मदत केली.मुलाचे वय वाढवलेआश्रमशाळेतील गैरप्रकाराची तक्रार होताच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक पी. आर. पाटील यांनी आपल्या सहकाऱ्यांकडून चौकशी सुरू केली. चौकशीत अनेक धक्कादायक बाबी उघड झाल्या. या घोटाळ्यातील मुख्य आरोपी, संस्था सचिव श्रीकृष्ण मते यांनी आपल्या संस्थेतील शिक्षक, कर्मचारी यांच्याकडून केवळ विद्यार्थ्यांची पटसंख्याच वाढविली नाही तर स्वत:च्या मुलाचे वयही दोन वर्षांनी वाढवून घेतले. मते यांनी त्यांचा मुलगा मुकेश याची जन्मतारीख ८ नोव्हेंबर १९८९ आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे श्रीकृष्ण मते यांनी ८ नोव्हेंबर १९८७ अशी दाखवून मुकेशला अनुदानित आदिवासी आश्रमशाळेत कनिष्ठ लिपिक म्हणून नियुक्त केले. त्याला त्याआधारे १६ लाख ५२ हजार रुपये ९१९ रुपये असा लाभ पोहोचविला. अशाप्रकारे मते आणि त्यांच्या आरोपी साथीदारांनी शासनाला २०१० ते २०१६ या कालावधीत ६१ लाख ५२ हजार ५३२ रुपयांचा चुना लावल्याचे एसीबीच्या चौकशीत उघड झाले. त्यावरून एसीबीने आज हिंगणा पोलीस ठाण्यात मते बापलेकासह १३ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला. एसीबीचे अधीक्षक पी. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक विजय माहूरकर, पोलीस निरीक्षक शुभांगी देशमुख, नायक दीप्ती मोटघरे यांनी ही कामगिरी बजावली. पुढील तपास सुरू आहे.
नागपूर जिल्ह्यातील उखळीच्या आश्रमशाळेत आर्थिक घोटाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2018 10:19 IST
उखळी गावात बनावट कागदपत्रांच्या आधारे विद्यार्थ्यांची पटसंख्या जास्त दाखवून लाखोंचे अनुदान हडपणाऱ्या संस्था सचिव व त्याचा मुलगा तसेच या दोघांना मदत करणाऱ्या १३ जणांविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला.
नागपूर जिल्ह्यातील उखळीच्या आश्रमशाळेत आर्थिक घोटाळा
ठळक मुद्देबनावट कागदपत्रांच्या आधारे लाखोंचे अनुदान हडपलेएसीबीने केला गुन्हा दाखल, बापलेकासह अधिकारीही आरोपी