मनपाचे आर्थिक रडगाणे
By Admin | Updated: December 14, 2015 03:14 IST2015-12-14T03:14:12+5:302015-12-14T03:14:12+5:30
गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी मालमत्ता विभागापासून अपेक्षित उत्पन्नाच्या तुलनेत १० कोटी उत्पन्न कमी आहे.

मनपाचे आर्थिक रडगाणे
वसुलीकडे दुर्लक्ष : संपत्ती कराची वसुली १० कोटींनी कमी
राजीव सिंग नागपूर
गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी मालमत्ता विभागापासून अपेक्षित उत्पन्नाच्या तुलनेत १० कोटी उत्पन्न कमी आहे. महापालिकेच्या उत्पन्नात वाढ होण्यासाठी आवश्यक प्रयत्न होत नसल्याने मालमत्ता विभागाला २५० कोटींचे उद्दिष्ट गाठणे शक्य नाही. दुसरीकडे आर्थिक स्थिती बिकट असल्याचे रडगाणे सुरू असल्याचे चित्र आहे.
स्थानिक स्वराज्य संस्था कर (एलबीटी) रद्द के ल्याच्या मोबदल्यात महापालिकेला दर महिन्याला सरकारकडून ३१ कोटींचे अनुदान मिळत आहे. मालमत्ता करापासून दर महिन्याला मिळणारे १० ते १२ कोटी व इतर विभागापासून मिळणाऱ्या उत्पन्नामुळे महापालिकेचा गाडा सुरू आहे. परंतु महापालिकेचा मुख्य आर्थिक स्रोत असलेल्या मालमत्ता विभागातील अधिकाऱ्यांच्या मनमानीचाही वसुलीवर परिणाम झाला आहे.
गेल्यावर्षी मालमत्ता करापासून २२५ कोटींच्या उत्पन्नाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. यावर्षी २५० कोटींचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे ३ डिसेंबरपर्यत या विभागाची वसुली १०२.२९ कोटी होणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात ९१.४९ कोटींचीच वसुली झाली आहे. एप्रिल महिन्यात संपत्ती कराच्या प्रारूपात बदल करण्यात आला होता. त्यानुसार २० ते ३० टक्के करवाढ करण्यात आली. जुलै महिन्यात आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी झोन अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करून विभागाला दर महिन्याला २० कोटींची वसुली करण्याचे निर्देश दिले होते. परंतु उद्दिष्ट गाठण्यात हा विभाग नापास झाला आहे. कर संकलन समितीचे सभापती गिरीश देशमुख यांचे विभागावर नियंत्रण नसल्याचे चित्र आहे. दरम्यान, यासंदर्भात अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता स्मार्ट सिटीच्या प्रकल्पामुळे वसुलीवर परिणाम झाल्याचे त्यांनी सांगितले.