माणिक पार्कमधील फ्लॅटधारकांची आर्थिक फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:09 IST2021-02-11T04:09:06+5:302021-02-11T04:09:06+5:30
नागपूर : एम.के. पाटील कन्स्ट्रक्शन कंपनीच्या मनीषनगर, रिलायन्स फ्रेशजवळील माणिक पार्क शांती-२ स्कीममधील ६६ फ्लॅटधारकांकडून रजिस्ट्रीवेळी घेतलेले वनटाइम मेंटेनन्सचे ...

माणिक पार्कमधील फ्लॅटधारकांची आर्थिक फसवणूक
नागपूर : एम.के. पाटील कन्स्ट्रक्शन कंपनीच्या मनीषनगर, रिलायन्स फ्रेशजवळील माणिक पार्क शांती-२ स्कीममधील ६६ फ्लॅटधारकांकडून रजिस्ट्रीवेळी घेतलेले वनटाइम मेंटेनन्सचे ७३ लाख रुपये देण्यास कंपनीचे पाच भागीदार टाळाटाळ करीत आहेत. कंपनीने आमच्या रकमेचा अपहार करून फसवणूक केल्याचा फ्लॅटधारकांचा आरोप आहे.
शांती-२ (ब्लॉक-२) माणिक पार्क अपार्टमेंट ओनर्स कन्डोमिनियमचे अध्यक्ष ए.व्ही. कुरेकर म्हणाले, एम.के. पाटील कन्स्ट्रक्शन कंपनीचे सध्या रोहित काचोरे, दामोधर काचोरे, नूतन काचोरे, राजेश काचोरे आणि मोरेश्वर काचोरे हे भागीदार आहेत. कंपनीने फ्लॅट विकताना दोन बीएचके फ्लॅटधारकांकडून एक लाख, तर तीन बीएचके फ्लॅटधारकांकडून सव्वा लाख असे एकूण ७३ लाख वनटाइम मेंटेनन्सच्या नावाखाली गोळा केले. या रकमेतून निवासी संकुलाच्या मेंटेनन्सची कामे जसे साफसफाई, पाण्याचे बिल, विजेचे बिल आदी खर्च केला जात होता; पण कंपनीने ही कामे फेब्रुवारी २०२० नंतर बंद केली. त्यानंतर फ्लॅटधारकांनी मेंटेनन्सची रक्कम वारंवार परत मागितली; पण कंपनी देण्यास टाळाटाळ करीत आहे. त्यामुळे फ्लॅटधारकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
कंपनीने मेंटेनन्स बंद केल्याने फ्लॅटधारकांनी एकत्रित येऊन शांती-२ (ब्लॉक-२) माणिक पार्क अपार्टमेंट ओनर्स कन्डोमिनियमची स्थापना केली. ही संस्था नोंदणीकृत आहे. या माध्यमातून प्रत्येक फ्लॅटधारकांकडून महिन्याला एक हजार रुपये घेऊन स्कीमचे मेंटेनन्स करण्यात येत आहे. पूर्वी भागीदार संजय माणिक काचोरे स्कीमचे सर्व व्यवहार करीत होते. त्यांनी मेंटेनन्सची कामे आणि देयके संबंधित कामे करणाऱ्या एजन्सीला फेब्रुवारी २०२० नंतर देणे थांबविले. त्यानंतर त्यांचे एप्रिल २०२० मध्ये निधन झाले. कंपनीने स्कीमचे मेंटेनन्स करणे बंद केल्याने भागीदारांनी आमचे ७३ लाख रुपये व्याजासह परत करावेत, अशी मागणी कुरेकर यांनी केली आहे.
कुरेकर म्हणाले, फसवणुकीच्या संदर्भात बेलतरोडी पोलीस ठाण्यात ७ जून २०२० रोजी तक्रार दाखल केली आणि सहायक पोलीस निरीक्षक वैजनाथ कुकडे यांनी चौकशीसाठी मागितलेली कागदपत्रे ३ जुलै २०२० रोजी सादर केली. पण सदरचे प्रकरण दिवाणी स्वरूपाचे असल्यामुळे दिवाणी न्यायालयात दाद मागावी, असे पत्र कुकडे यांनी २४ सप्टेंबर २०२० रोजी फ्लॅटधारकांना दिले. फसवणुकीच्या संदर्भात पोलीस आयुक्तांना पत्र दिले आहे. कंपनीने फसवणूक केल्याने फ्लॅटधारकांवर अतिरिक्त आर्थिक बोझा पडत आहे.
रक्कम कुणाला द्यायची
माणिक पार्क शांती-२ ही स्कीम आमची असून, भागीदारीत आहे. येथील फ्लॅटधारकांकडून रजिस्ट्रीवेळी ७३ लाख रुपये वनटाइम मेंटनन्सचे घेतले आहे. हे पैसे बँकेत जमा असून, फ्लॅटधारकांना परत करण्यास तयार आहे. रक्कम मागण्यासाठी आमच्याकडे कुणीही आले नाहीत. पण पैसे कुणाच्या हातात द्यायचे हा प्रश्न आहे. फ्लॅटधारकांच्या सोसायटीने ठराव घ्यावा, सोबत बँकेत आणि पोलीस ठाण्यात चालावे.
राजेश काचोरे, भागीदार, एम.के. पाटील कन्स्ट्रक्शन.