फायनान्स कंपनीला नऊ कोटींचा गंडा
By Admin | Updated: September 9, 2015 03:03 IST2015-09-09T03:03:34+5:302015-09-09T03:03:34+5:30
फायनान्स कंपनीला नऊ कोटींचा गंडा घातल्याच्या आरोपावरून अंबाझरी पोलिसांनी रामदासपेठेतील लिंक्सन इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि.चे संचालक ...

फायनान्स कंपनीला नऊ कोटींचा गंडा
रामदासपेठेतील यशवंत सांगलाकडे छापा : गुन्हे शाखेची कारवाई
नागपूर : फायनान्स कंपनीला नऊ कोटींचा गंडा घातल्याच्या आरोपावरून अंबाझरी पोलिसांनी रामदासपेठेतील लिंक्सन इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि.चे संचालक यशवंत लालचंद सांगला, मंजू यशवंत सांगला आणि गौरव यशवंत सांगला या तिघांविरुद्ध फसवणुकीचे गुन्हे दाखल केले. यानंतर मंगळवारी सकाळी गुन्हे शाखेच्या (ईओडब्ल्यू) पथकाने आरोपी सांगलाच्या बंगल्यावर छापा घालून सायंकाळपर्यंत तपासणी केली.
आरोपी सांगलाने रामदासपेठसारख्या सर्वाधिक महागड्या भागात १३३७ चौरस मीटर परिसरात यश हाईटस् नामक निवासी आणि व्यावसायिक संकुल उभारले होते. त्यासाठी आरोपी यशवंत सांगलाने अंबाझरी, वेस्ट हायकोर्ट मार्गावरील इंडिया इन्फोलाईन्स फायनान्स कंपनीकडून २५ एप्रिल २०११ ला ८ कोटी ९० लाखांचे कर्ज घेतले होते. कर्जाच्या परतफेडीचे हप्ते भरण्यास आरोपी सांगला टाळाटाळ करीत होता. कर्ज घेताना केलेल्या कराराप्रमाणे फायनान्स कंपनीच्या नाहरकत प्रमाणपत्राशिवाय कोणतीही सदनिका अथवा गाळा विकण्यास मनाई होती.
बनावट कागदपत्राने कर्जाची उचल
फायनान्स कंपनीला नऊ कोटींचा गंडा
नागपूर : आरोपींनी या कराराचे उल्लंघन केले. एवढेच नव्हे तर बनावट कागदपत्रे तयार करून आरोपींनी बँक आॅफ बडोदाकडूनही मोठ्या रकमेचे कर्ज उचलले.एवढेच नव्हे तर फायनान्स कंपनीसोबत कर्जाच्या कराराचे उल्लंघन करून त्यातील काही मालमत्ताही परस्पर विकून टाकली. ही फसवणूक लक्षात आल्यानंतर फायनान्स कंपनीने पोलिसांकडे धाव घेतली. प्रकरण कोट्यवधीच्या फसवणुकीचे असल्यामुळे गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी त्याची बारीकसारीक तपासणी केली. (प्रतिनिधी)
गुन्हा दाखल,
बंगल्यात छापा
फसवणुकीतील महत्त्वाचे पुरावे हाती आल्यानंतर गुन्हे शाखेच्या उपायुक्त दीपाली मासिरकर यांनी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानंतर फायनान्स कंपनीतर्फे विशाल परसराम रंगारी यांच्या तक्रारीवरून अंबाझरीचे पीएसआय पांडुरंगजी बोरगे यांनी यशवंत, त्याची पत्नी मंजू आणि मुलगा गौरव या तिघांविरुद्ध गुन्हे दाखल केले. दरम्यान, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक जी. पाटील आणि प्रदीप लांडे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह मंगळवारी सकाळी सांगलाच्या सिव्हिल लाईनमधील करोडपती गल्लीत असलेल्या पॉश बंगल्यात छापा घातला.