अखेर सूर नदीत साेडले पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:08 IST2021-04-13T04:08:33+5:302021-04-13T04:08:33+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क खात : सूर नदी ही माैदा तालुक्यातील काही गावांची जीवनदायिनी आहे. ती काेरडी झाल्याने या नदीकाठी ...

Finally, the water in the river Sur | अखेर सूर नदीत साेडले पाणी

अखेर सूर नदीत साेडले पाणी

लाेकमत न्यूज नेटवर्क

खात : सूर नदी ही माैदा तालुक्यातील काही गावांची जीवनदायिनी आहे. ती काेरडी झाल्याने या नदीकाठी असलेल्या गावांमधील पाणीपुरवठा प्रभावित झाला हाेता. त्या नदीत रविवार (दि. ११)पासून पेंच प्रकल्पाचे पाणी साेडायला सुरुवात झाल्याने या गावांमधील नागरिकांची पिण्याच्या पाण्याची समस्या तूर्तास मिटली आहे.

खात (ता. माैदा) परिसरातून वाहणाऱ्या सूर नदीच्या काठावर आलेल्या काही गावांना याच नदीच्या पात्रातून पाणीपुरवठा केला जाताे. त्यासाठी पाणीपुरवठा याेजनांतर्गत नदीकाठी विहिरी खाेदण्यात आल्या आहेत. मागील काही दिवसांपासून या नदीचे पात्र काेरडे झाल्याने पाणीपुरवठ्याच्या विहिरींमधील पाण्याची पातळी खालावली हाेती. त्यामुळे या गावांना पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवायला सुरुवात झाली हाेती.

यासंदभार्त लाेकमतमध्ये शनिवारी (दि. १०) ‘सूर नदीचे पात्र काेरडे, पाणीपुरठा याेजना बंद’ या शीर्षकाखाली वृत्त प्रकाशित करण्यात आले हाेते. या नदीच्या पात्राला पेंच प्रकल्पाचा डावा कालवा जाेडला असल्याने पेंच प्रकल्पातील पाणी या कालव्याद्वारे नदीच्या पात्रात साेडण्याची सूचनाही प्रशासनाला या वृत्तातून करण्यात आली हाेती. प्रशासनाने या वृत्ताची तातडीने दखल घेत रविवारपासून पेंच प्रकल्पातील पाणी सूर नदीच्या पात्रात साेडायला सुरुवात केली आहे. त्यामुळे पाणीपुरवठ्याच्या विहिरींचा जलस्तर वाढत असून, संबंधित गावांमधील पाणीसममस्या सुटण्यास मदत हाेणार असल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

Web Title: Finally, the water in the river Sur