अखेर विद्यापीठ-सहसंचालकांचा समेट

By Admin | Updated: February 24, 2016 03:15 IST2016-02-24T03:15:19+5:302016-02-24T03:15:19+5:30

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या प्रलंबित ‘सेवार्थ’ प्रणालीचे काम लवकरच मार्गी लागण्याची चिन्हे आहेत.

Finally, the University-cum-Directors' reconciliation | अखेर विद्यापीठ-सहसंचालकांचा समेट

अखेर विद्यापीठ-सहसंचालकांचा समेट

‘सेवार्थ’साठी एकत्र काम करणार : विद्यापीठातील बैठकीत निर्णय
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या प्रलंबित ‘सेवार्थ’ प्रणालीचे काम लवकरच मार्गी लागण्याची चिन्हे आहेत. हे काम अनेक दिवसांपासून अडकले असल्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून नागपूर विद्यापीठातील ९९७ अधिकारी व कर्मचाऱ्यांचे वेतन सामान्य निधीतूनच होत आहे. हे काम लवकर व्हावे यासाठी उच्चशिक्षण विभागाच्या सहसंचालक डॉ. अंजली रहाटगावकर यांनी कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांची विद्यापीठात भेट घेतली. या कामासाठी एकत्रितपणे प्रयत्न करण्याला दोघांनीही मान्यता दिली. ‘लोकमत’ने कर्मचाऱ्यांच्या हितासंदर्भातील हा मुद्दा सातत्याने लावून धरला होता, हे विशेष.
राज्यातील विद्यापीठांमधील अधिकारी, कर्मचाऱ्यांचे पगार सेवार्थ प्रणालीद्वारे करण्याचा निर्णय उच्च शिक्षण विभागाने घेतला. त्यानुसार उच्च शिक्षण सहसंचालकांनी मागवलेली कर्मचारी व अधिकाऱ्यांची माहिती कागदपत्रांसह विद्यापीठाने कळविणे अपेक्षित होते. यात अगदी कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीपासूनच्या सखोल माहितीचा समावेश होता. परंतु ही माहिती तसेच कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या ‘सर्व्हिस बुक’ची तपासणी पूर्ण झालेली नाही. यासंदर्भात विद्यापीठाने एका ‘एजन्सी’ला हे काम दिले होते. परंतु त्यांनी हे काम पूर्ण केले नाही. अखेर विद्यापीठातील कर्मचाऱ्यावर याची जबाबदारी देण्यात आली आहे. कर्मचारी संख्या मोठी असल्यामुळे संबंधित काम पूर्ण व्हायला दोन ते तीन महिने लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती.
विद्यापीठाचे ‘सेवार्थ’चे काम लवकरात लवकर व्हावे यासाठी मुंबईतून विशेष पथक नागपुरात पाठविण्यासाठी उच्चशिक्षण विभागाने मान्यता दिली. दरम्यान, डॉ. रहाटगावकर यांनी मंगळवारी सकाळी कुलगुरूंची विद्यापीठात भेट घेतली व ‘सेवार्थ’च्या मुद्यावर चर्चा केली. ‘सेवार्थ’संदर्भात विद्यापीठाने ८० मुद्दे असलेला प्रत्येक कर्मचाऱ्याचा ‘आॅनलाईन’ अर्ज भरला. परंतु यासोबत आणखी एक १२ मुद्दे असलेला अर्जदेखील भरणे आवश्यक असल्याचे सहसंचालकांनी कुलगुरूंच्या निदर्शनास आणून दिले. संबंधित माहिती भरणे व कर्मचारी-अधिकाऱ्यांच्या कागदपत्रांची तपासणी करणे यासाठी विद्यापीठातील सहा ते सात कर्मचारी तसेच उच्चशिक्षण विभागातील सहा अधिकारी-कर्मचारी एकत्रितपणे काम करतील, असे ठरविण्यात आले. याशिवाय दोन तांत्रिक तज्ज्ञदेखील या कामात नेमण्यात आले आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.(प्रतिनिधी)

Web Title: Finally, the University-cum-Directors' reconciliation