अखेर विद्यार्थ्यांसाठी सुरू केले वसतिगृह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:51 IST2021-02-05T04:51:10+5:302021-02-05T04:51:10+5:30
नागपूर : बारावीचे वर्ग सुरू झाले असून, परीक्षा तोंडावर आहे. काही ज्युनि. कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांच्या प्रॅक्टिकल परीक्षा सुरू झाल्या आहेत. ...

अखेर विद्यार्थ्यांसाठी सुरू केले वसतिगृह
नागपूर : बारावीचे वर्ग सुरू झाले असून, परीक्षा तोंडावर आहे. काही ज्युनि. कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांच्या प्रॅक्टिकल परीक्षा सुरू झाल्या आहेत. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात घरी बसलेले विद्यार्थी कॉलेजात जायला लागले आहे. परंतु बाहेरगावातील जे विद्यार्थी शहरातील ज्युनि. कॉलेजमध्ये शिकतात व समाजकल्याण विभागाच्या वसतिगृहात राहतात, त्या विद्यार्थ्यांची कॉलेज सुरू झाल्याने चांगलीच गोची झाली होती. वसतिगृह बंद असल्याने विद्यार्थ्यांच्या निवासाच्या अडचणी निर्माण झाल्या होत्या. सोमवारी या विद्यार्थ्यांनी सामाजिक न्यायभवनच्या प्रवेशद्वारापुढे ठिय्या दिल्यानंतर अधिकाऱ्यांनी त्यांना वसतिगृह उपलब्ध करून दिले.
गेल्या चार दिवसापासून वसतिगृहासाठी काही विद्यार्थी सामाजिक न्यायभवनपुढे येऊन अधिकाऱ्यांना भेटून वसतिगृह सुरू करा, अशी मागणी करीत होते. या विद्यार्थ्यांनी नागपूर दौऱ्यावर आलेले सामाजिक न्याय विभागाच्या सचिवांचीसुद्धा भेट घेतली. परंतु कुठलाही तोडगा निघाला नाही. त्यामुळे सोमवारी काही विद्यार्थ्यांनी सामाजिक न्यायभवनच्या प्रवेशद्वारावरच ठिय्या देऊन वसतिगृह सुरू करण्याची मागणी केली. हे विद्यार्थी विदर्भातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील असून, समाजकल्याण विभागाच्या वसतिगृहात राहून शिकत आहेत. समाजकल्याण विभागाने अजूनही वसतिगृह सुरू करण्याचा निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना निवासाच्या अडचणी येत होत्या. कॉलेजचे प्रॅक्टिकल सुरू झाल्यामुळे आणि परीक्षेच्या तयारीसाठी विद्यार्थ्यांना वसतिगृहाची आवश्यकता होती. सोमवारी या विद्यार्थ्यांनी वसतिगृह सुरू होईपर्यंत ठिय्या देण्याचा निर्णय घेतला. विद्यार्थ्यांच्या या भूमिकेमुळे अधिकाऱ्यांनी तातडीने तडजोड करीत वसतिगृह विद्यार्थ्यांसाठी सुरू करून दिले, सोबतच त्यांच्या भोजनाचीही व्यवस्था वसतिगृहात करून दिली.