अखेर वन विभागालाही मिळाली कोठडी
By Admin | Updated: June 4, 2015 02:41 IST2015-06-04T02:41:27+5:302015-06-04T02:41:27+5:30
वनगुन्ह्यांचे प्रमाण अधिक असूनही वन विभागाचे मुख्यालय असलेल्या नागपुरात वन गुन्हेगारांना ठेवायला स्वतंत्र कोठडीच (कस्टडी) आजवर नव्हती.

अखेर वन विभागालाही मिळाली कोठडी
आनंद डेकाटे नागपूर
वनगुन्ह्यांचे प्रमाण अधिक असूनही वन विभागाचे मुख्यालय असलेल्या नागपुरात वन गुन्हेगारांना ठेवायला स्वतंत्र कोठडीच (कस्टडी) आजवर नव्हती. त्यामुळे वन गुन्हेगाराला पकडल्यानंतर त्याला ठेवण्यासाठी वन विभागाला पोलिसांची मदत घ्यावी लागत होती. त्यात वेळ खर्ची होऊन वन गुन्ह्याच्या तपासावर परिणाम होत होता. परंतु आता वन विभागालाही हक्काची कोठडी मिळाली आहे. सेमिनरी हिल्स येथे वनकोठडी उभारण्यात आली आहे.
नागपूरसह संपूर्ण विदर्भ हे वन वैभवाने नटलेले आहे. येथील वनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वनसंपदा असून वन्यजीवांचा भरणा आहे. हरीण, सांबर, नीलगाय, कोल्हे आदींसह सर्वच प्रकारचे प्राणी विदर्भात आढळून येतात. संपूर्ण देशात विदर्भातच सर्वाधिक वाघ आढळून येतात. त्यामुळे नागपूर हे व्याघ्र राजधानी म्हणूनही प्रसिद्ध आहे. तसेच वन विभागाचे मुख्यालयसुद्धा आहे. वनसंपदा मोठ्या प्रमाणावर असल्याने त्याची सुरक्षाही महत्त्वाची बाब आहे. परंतु पुरेसे मनुष्यबळ नसल्याने मागील काही वर्षात वनगुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. यात वृक्षतोड, जंगलांना आगी लावणे आणि वन्यप्राण्यांची शिकार आदी महत्त्वाचे गुन्हे आहेत. गेल्या काही वर्षात नागपूर हे वाघ व इतर वन्य प्राण्यांच्या तस्करीचे मोठे केंद्र म्हणून पुढे आले आहे. नागपूर व विदर्भातील वनांमध्ये शिकार करून त्याची तस्करी करण्याचे प्रकार वाढले आहेत. वन विभाग आणि सीबीआयने राबविलेल्या अभियानांतर्गत वन्यप्राण्यांची तस्करी करणाऱ्या सात मोठ्या तस्करांना अटक करण्यात आली होती. कुट्टू पारधी या आंतरराष्ट्रीय तस्कराला सुद्धा काही महिन्यांपूर्वी कटनी येथून अटक करून नागपुरात आणण्यात आले होते. अशा वन गुन्हेगारांना अटक केली जाते तेव्हा त्यांना ठेवायचे कुठे, हा महत्त्वाचा प्रश्न वन विभागासमोर असतो. कारण वन गुन्हेगारांना ठेवण्यासाठी वन विभागाकडे स्वतंत्र अशी फॉरेस्ट कस्टडीच आजवर नव्हती.
त्यामुळे वन विभागातील अधिकाऱ्यांना वन गुन्हेगारांना ठेवण्यासाठी पोलिसांची मदत घ्यावी लागत असे. बहुतांश सीताबर्डी पोलीस ठाण्यातील कोठडीमध्ये वन गुन्हेगारांना ठेवले जाते. त्यांना न्यायालयात सादर करणे. त्यात त्यांना न्यायालयीन कोठडी मिळाली तर ठीक परंतु वनकोठडी मिळाली तर पुन्हा पोलीस ठाण्यातील कोठडीत ठेवावे लागते. गुन्ह्याचा तपासासाठी गुन्हेगाराची विचारपूस करण्यासाठी त्याला पुन्हा घेऊन येणे, कोठडीत सोडून देणे यातच अधिकाऱ्यांचा सर्वाधिक वेळ जातो. त्यामुळे वनगुन्ह्याच्या तपासाच्या गतीवर त्याचा परिणाम होत होता. परंतु आता वन विभागाला त्याच्या हक्काची कोठडी मिळाली असल्याने वनगुन्ह्यांचे तपास आता अधिक गतीने होतील.
तीन गुन्हेगार राहू शकतील
वन मुख्यालयात गुन्हेगारांना ठेवण्यासाठी कोठडी नसल्याने तपासावर परिणाम होत असल्याची बाब वन विभागाचे वरिष्ठ अधिकारीही मान्य करतात. त्यामुळे वन विभागासाठी स्वतंत्र कस्टडी तयार करण्यात यावी, असा प्रस्ताव अनेक वर्षांपासून होता. तो प्रस्ताव मंजूर होऊन सेमिनरी हिल्स परिसरात स्वतंत्र वनकोठडी तयार करण्याचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. तीन गुन्हेगार एकाच वेळी राहू शकतील, इतकी त्याची क्षमता आहे. या वनकोठडीचे उद्घाटनही लवकरच होणार असल्याने वन अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.