अखेर ‘सेस’वसुली रद्द
By Admin | Updated: January 3, 2015 02:26 IST2015-01-03T02:26:43+5:302015-01-03T02:26:43+5:30
रस्ते बांधणीवर झालेला खर्च पेट्रोल-डिझेलवर ‘सेस’(कर) आकारून वसूल करण्याचा निर्णय शासनाने अखेर रद्द केल्याने शुक्रवार मध्यरात्रीपासून पुन्हा पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात करण्यात आली आहे.

अखेर ‘सेस’वसुली रद्द
नागपूर : रस्ते बांधणीवर झालेला खर्च पेट्रोल-डिझेलवर ‘सेस’(कर) आकारून वसूल करण्याचा निर्णय शासनाने अखेर रद्द केल्याने शुक्रवार मध्यरात्रीपासून पुन्हा पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात करण्यात आली आहे. त्यामुळे आता नागपूरकरांसाठी पेट्रोल प्रति लिटर ५६ पैशांनी तर डिझेल १.५२ पैशांनी स्वस्त झाले आहे. दरवाढीच्या विरोधात ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करून शासनाचे याकडे लक्ष वेधले होते. त्याचा परिणाम दर कमी होण्यात झाला हे येथे उल्लेखनीय.
नागपूरमध्ये महापालिका क्षेत्रात एकात्मिक रस्ते विकास योजनेतून (आयआरडीपी) रस्ते बांधणीसाठी ३५० कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. हा खर्च वसूल करण्यासाठी २०१२ पासून पेट्रोल-डिझेलवर अनुक्रमे एक व दोन टक्के अतिरिक्त कर आकारला जात होता. त्यामुळे इतर शहराच्या तुलनेत नागपुरातील इंधनाचे दर अधिक राहात होते. कर वसुलीची मुदत ३१ डिसेंबर २०१४ च्या मध्यरात्री संपल्यावर पेट्रोल-डिझेलचे दरही कमी करण्यात आले होते. परंतु लगेचच दुसऱ्या दिवशी म्हणजे १ जानेवारीला कुठलीही अधिसूचना न काढता पुन्हा कर आकारणी सुरू झाली. त्यामुळे दर पु्न्हा जैसे थे झाले. ‘लोकमत’ने यासंदर्भात सविस्तर वृत्त प्रकाशित करून दरवाढीच्या माध्यमातून वाहनधारकांवर होणारा अन्याय चव्हाट्यावर आणला होता. वृत्त प्रकाशित होताच सरकार खडबडून जागे झाले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अर्थमंत्र्यांनी तातडीने मुख्यमंत्र्यांशी याबाबत चर्चा केली. त्यानंतर कर आकारणीचा निर्णय मागे घेऊन नागपूरकरांना दिलासा देण्यात आला. दरम्यान वितरकांनीही आमदार शोभा फडणवीस यांच्या माध्यमातून अर्थमंत्र्यांपर्यत आपले म्हणने पोहोचविले. (प्रतिनिधी)