अखेर ४९ वनपालांना मिळाले पदोन्नतीचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:08 IST2021-05-13T04:08:02+5:302021-05-13T04:08:02+5:30
नागपूर : राज्यात वन विभागातील ४९ वनपालांना अखेर पदोन्नतीचे आदेश मिळाले आहे. ११ मे रोजी सायंकाळी उशिरा वन विभागाकडून ...

अखेर ४९ वनपालांना मिळाले पदोन्नतीचे आदेश
नागपूर : राज्यात वन विभागातील ४९ वनपालांना अखेर पदोन्नतीचे आदेश मिळाले आहे. ११ मे रोजी सायंकाळी उशिरा वन विभागाकडून ही यादी जाहीर करण्यात आली. विशेष म्हणजे, या सर्व वनपालांची पदोन्नती झाली असली तरी त्यांना सेवाज्येष्ठतेचा हक्क मात्र राहणार नसल्याचे या आदेशात म्हटले आहे.
नागपूर, अमरावती, औरंगाबाद, पुणे, नाशिक आणि कोकण-१, या महसुली संवर्गातील वनपालांच्या या पदोन्नत्या आहेत. या बदल्या आहेत. २०१९-२० मध्ये झालेल्या प्रक्रियेत ही निवड सूची तयार करण्यात आली होती. त्यानुसार, वनक्षेत्रपाल (गट-ब) राजपत्रित या पदावर तात्पुरत्या स्वरूपात पदोन्नती आणि पदस्थापना देण्यात आली आहे; मात्र यासाठी या ४९ वनपालांना तब्बल एक वर्ष तीन महिने प्रतीक्षा करावी लागली. सर्व प्रक्रिया पूर्ण होऊनही आदेश काढण्याची प्रक्रिया मात्र अडली. तत्कालिन वनमंत्री संजय राठोड यांनी या प्रक्रियेतील अधिकार स्वत:कडे घेतले होते. त्यानंतर बराच काळ ही प्रक्रिया लांबली. नंतरच्या काळात त्यांच्या राजीनाम्यानंतरही हे काम तीन महिने रेंगाळले. अखेर मंगळवारी सायंकाळी हे आदेश निघाले आहेत.
सरळसेवेच्या कोट्यातील खुल्या प्रवर्गातील वन विभागात असलेली ही रिक्त पदे तात्पुरत्या स्वरूपात सेवाज्येष्ठतेनुसार भरण्यात आली आहेत. ही पदोन्नती ११ महिने किंवा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून उमेदवार उपलब्ध होईपर्यंत असेल, असे या आदेशात म्हटले आहे. ही पदोन्नती तात्पुरत्या स्वरूपात असून, या पदावर संबंधित अधिकाऱ्याला कायमस्वरूपी धारणाधिकार राहणार नाही, त्यामुळे नियमिततेचा व सेवाज्येष्ठतेचा कोणताही हक्क मिळणार नाही, असेही या आदेशात म्हटलेले आहे.