कुश हत्याकांडावर बुधवारपासून अंतिम सुनावणी
By Admin | Updated: February 22, 2015 02:23 IST2015-02-22T02:23:08+5:302015-02-22T02:23:08+5:30
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्यभर गाजलेल्या हृदयद्रावक कुश कटारिया हत्याकांडावर २५ फेब्रुवारीपासून अंतिम सुनावणी निश्चित केली आहे.

कुश हत्याकांडावर बुधवारपासून अंतिम सुनावणी
नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्यभर गाजलेल्या हृदयद्रावक कुश कटारिया हत्याकांडावर २५ फेब्रुवारीपासून अंतिम सुनावणी निश्चित केली आहे. न्यायमूर्तीद्वय अरुण चौधरी व प्रदीप देशमुख यांच्या न्यायपीठासमक्ष प्रकरण ऐकले जाणार आहे. हे प्रकरण १५ आॅक्टोबर २०१३ रोजी अंतिम सुनावणीसाठी दाखल करून घेण्यात आले होते.
आयुष निर्मल पुगलिया (वय २४) असे मुख्य आरोपीचे नाव आहे. सत्र न्यायालयाने आयुषला अपहरण, हत्या व पुरावे नष्ट करण्याच्या आरोपाखाली दुहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. परंतु, भादंविच्या कलम ३६४-अ (खंडणीसाठी अपहरण) मधून त्याला दोषमुक्त करण्यात आले आहे. आयुषने त्याच्या शिक्षेला उच्च न्यायालयात अपील करून आव्हान दिले आहे. याशिवाय शासनाच्या दोन अपील आहेत.
एक अपील आयुषला फाशीची शिक्षा देण्यासाठी, तर दुसरे अपील भादंविच्या कलम ३६४ (अ)मधून सुटकेला आव्हान देणारे आहे. शासनातर्फे बाजू मांडण्यासाठी अॅड. राजेंद्र डागा यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
ही घटना ११ आॅक्टोबर २०११ रोजीची आहे. सुरुची मसाला कंपनीचे संचालक राजू ऊर्फ प्रशांत कटारिया यांचा सात वर्षीय मुलगा कुश हा शुभम बैद व रिदम पुरिया या दोन मित्रांसोबत खेळत होता. तेवढ्यात आयुषने चॉकलेटचे आमिष दाखवून कुशला सूर्यनगरातील एका निर्माणाधीन इमारतीच्या आवारात नेले. तेथे आधी कुशच्या डोक्यावर विटेने प्रहार केला व नंतर त्याचा कटरने गळा कापला. कुशचा मृतदेह इमारतीच्या पाण्याच्या टाकीत फेकून दिला.
आयुषने दोन कोटी रुपयांच्या खंडणीसाठी कुशचे अपहरण केल्याचा आरोप आहे. (प्रतिनिधी)