नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील पदव्युत्तर विभागांमध्ये मोठ्या प्रमाणावर सुविधांचा अभाव आहे. परंतु आॅगस्ट महिन्यात ‘नॅक’ समितीचा दौरा असल्याने सगळीकडे किती ‘चांगले’ चित्र आहे हे दाखविण्याची विद्यापीठाची तयारी सुरू आहे. या समितीला सामोरे कसे जायचे यासंदर्भात विभागप्रमुखांना विशेष प्रशिक्षण दिले जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या समितीसमोर जे काही मांडाल ते चांगलेच असले पाहिजे अशा ‘टीप्स’देखील या माध्यमातून देण्यात येत आहेत. आॅगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात ‘नॅक’ची समिती विद्यापीठाला भेट देणार आहे. कुठल्याही परिस्थितीत यंदा ‘अ’ श्रेणी मिळावी यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. स्वत: प्रभारी कुलगुरू अनुपकुमार यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. यासंदर्भात त्यांनी काही दिवस अगोदर विभागप्रमुखांची बैठक घेतली होती. यात ‘नॅक’च्या मागील दौऱ्यात झालेल्या चुकांवर चर्चा झाली. मागील वेळच्या त्रुटी यावेळी दूर करण्याकडे यंदा भर देण्यात येत आहे. जास्तीत जास्त चांगले सादरीकरण कसे होईल, समितीसमोर कसे बोलायचे इत्यादी मुद्यांवर मार्गदर्शन करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)
‘आॅल इज वेल’वर भर
By admin | Updated: July 12, 2014 02:28 IST