हॉटेल व्यावसायिक अरोरा परिवाराविरुद्ध गुन्हा दाखल
By Admin | Updated: May 21, 2016 03:04 IST2016-05-21T03:04:47+5:302016-05-21T03:04:47+5:30
पत्नीवर अनैसर्गिक अत्याचार करून तिचा अनन्वित छळ केल्याप्रकरणी अंबाझरी पोलिसांनी सिव्हील लाईन मधील हॉटेल व्यावसायिक हरदिपसिंग अरोरा तसेच ...

हॉटेल व्यावसायिक अरोरा परिवाराविरुद्ध गुन्हा दाखल
विवाहितेचा अनन्वित छळ : अनैसर्गिक अत्याचार
नागपूर : पत्नीवर अनैसर्गिक अत्याचार करून तिचा अनन्वित छळ केल्याप्रकरणी अंबाझरी पोलिसांनी सिव्हील लाईन मधील हॉटेल व्यावसायिक हरदिपसिंग अरोरा तसेच त्याच्या कुटुंबातील चार सदस्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला. यामुळे सर्वत्र उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हरदिपसिंगचा जुलै २०१५ मध्ये एका बड्या कुटुंबातील तरुणीसोबत (वय १९) मोठ्या थाटामाटात विवाह झाला होता. लग्नात मनासारखे मिळाले नाही, असे सांगून अरोरा परिवारातील सदस्य हरदिपसिंगच्या पत्नीला त्रास देऊ लागले. हा त्रास ती पती हरदिपसिंगला सांगत होती. मात्र, तिला दिलासा देण्याऐवजी हरदिपसिंग तिच्यावर अनैसर्गिक संबंधासाठी दबाव आणत होता. सासरच्या मंडळीसोबत त्याचाही अत्याचार असह्य झाल्याने पती-पत्नीत खटके उडू लागले. ते पाहून हरदिपसिंगच्या नातेवाईकांनी पीडितेची कोंडी करणे सुरू केले. या पार्श्वभूमीवर, हरदिपसिंगने पत्नीला बाहेर नेले. तेथेही त्याने तिच्यावर अनैसर्गिक अत्याचार केला. त्यामुळे बाहेरून परतल्यानंतर तिने आपल्या माहेरच्यांना या असह्य त्रासाची कल्पना दिली. वाद मिटावा म्हणून हरदिपसिंगच्या सासरच्या मंडळींनी प्रतिष्ठितांना सोबत घेऊन दोन्ही कुटुंबीयांची समोरासमोर बैठक घेतली. अरोरा परिवारातील सदस्यांची समजूत काढण्याचे प्रयत्न झाले. मात्र, या बैठकीत तोडगा निघण्याऐवजी वाद जास्तच वाढला. त्यानंतर गुरुद्वारा समितीकडे हा वाद पोहचला. तेथे समुपदेशन झाल्यानंतर काही दिवस चांगले गेले. नंतर मात्र, तसेच सर्व सुरू झाल्याने हरदिपसिंगच्या पत्नीने पोलिसांकडे धाव घेतली. आधी जरीपटका, नंतर सदर पोलिसांकडून कारवाईसाठी टाळाटाळ झाल्याने पीडित महिलेने वरिष्ठांकडे धाव घेतली.
तिची कैफियत ऐकून घेतल्यानंतर आज सायंकाळी अंबाझरी पोलिसांना तक्रार नोंदवून घेण्याचे वरिष्ठांनी आदेश दिले. त्यानंतर पीडित महिलेच्या तक्रारीनुसार, पोलिसांनी आरोपी हरदिपसिंग अरोरा, तेजपालसिंग अरोरा, अजिंदरकौर अरोरा, संदीपसिंग तेजपालसिंग अरोरा आणि ईशा अरोरा विरुद्ध हुंड्यासाठी शारीरिक व मानसिक त्रास देणे, मारहाण करणे, विनयभंग करणे आणि हरदिपसिंगविरुद्ध अनैसर्गिक अत्याचार करण्याचा गुन्हा दाखल केला.(प्रतिनिधी)