सिलींगच्या जमिनीसाठी १६ वर्षांपासून लढा
By Admin | Updated: December 20, 2014 02:36 IST2014-12-20T02:36:44+5:302014-12-20T02:36:44+5:30
शासनाने १९९८ मध्ये २ एकर सिलींगची जमीन देण्याची घोषणा केली. जमिनीचा सातबाराही दिला. परंतू सातत्याने १६ वर्षे लढा देऊनही जमीन काही मिळाली नाही.

सिलींगच्या जमिनीसाठी १६ वर्षांपासून लढा
दयानंद पाईकराव नागपूर
शासनाने १९९८ मध्ये २ एकर सिलींगची जमीन देण्याची घोषणा केली. जमिनीचा सातबाराही दिला. परंतू सातत्याने १६ वर्षे लढा देऊनही जमीन काही मिळाली नाही. त्यामुळे हताश झालेले प्रल्हाद महादेव भलावी हे १६ वर्षांपासून जमीन मिळेल या आशेपोटी शासनाचा आणि तहसिल कार्यालयाचा उंबरठा झिजवित आहेत.
किसान अधिकार अभियानाच्या मोर्चात प्रल्हाद महादेव भलावी (६५) रा. पळसगाव ता. देवळी जिल्हा वर्धा हे सामील झाले आहेत. प्रल्हाद यांची पत्नी छबुबाई यांच्या नावाने शासनाने १९९८ मध्ये २ एकर सिलींगची जमीन देण्याची घोषणा केली. शेतीचा सातबाराही त्यांना देण्यात आला. परंतु प्रत्यक्षात जमिनीचे वाटप केले नाही. मागील १६ वर्षांपासून ते शासनाकडे आणि तहसिल कार्यालयात जमीन मिळावी म्हणून पाठपुरावा करीत आहेत. प्रल्हाद भलावी यांच्या कुटुंबात पत्नी छबुबाई आणि एक मुलगा आहे. जमीन नसल्यामुळे त्यांना, त्यांची पत्नी आणि मुलाला मजुरी करण्याची पाळी आली आहे. परिस्थिती हलाखीची असल्यामुळे त्यांच्या मुलाला शिक्षण घेता आले नाही.
रोजमजुरी करून ते आपली उपजीविका भागवित आहेत. पळसगाव पासून ३ किलोमीटर अंतरावर असलेल्या आगरगाव येथे त्यांना जमीन मिळणार होती. मागील वेळी त्यांनी ७२ तास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. त्यावेळी त्यांना ६ महिन्यात जमीन देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. परंतु जिल्हाधिकारी कार्यालयाने दिलेली ६ महिन्यांची मुदतही संपली. त्यांचा हा लढा मागील १६ वर्षांपासून तसाच सुरू आहे. जमीन मिळेल आणि आपल्या मागील रोजमजुरीची कटकट बंद होईल या आशेने ते शासनाकडे आपली फिर्याद घेऊन मोर्चात सहभागी झाले आहेत.