हा लढा विदर्भाचा विजयी विराट होवो
By Admin | Updated: November 7, 2016 02:43 IST2016-11-07T02:43:50+5:302016-11-07T02:43:50+5:30
आमगाव आणि खासगाव हे तसे भिन्न प्रकृतीचे दोन गाव. यातल्या खासगावातील नागरिक अत्यंत चलाख असतात.

हा लढा विदर्भाचा विजयी विराट होवो
‘खुर्द-बुद्रुक’ने पेरली नवीन ऊर्जा : स्पेशल प्रीमियरला उत्स्फूर्त प्रतिसाद
नागपूर : आमगाव आणि खासगाव हे तसे भिन्न प्रकृतीचे दोन गाव. यातल्या खासगावातील नागरिक अत्यंत चलाख असतात. कसेही करून आपला स्वार्थ साधण्यासाठी आमगावच्या नागरिकांना मराठी असण्याची भावनिक साद घालून आपल्या सोबत घेतात व उद्देशपूर्ती झाल्यावर स्वत: विलासी आयुष्य जगत आमगावला अडगळीतील निकामी वस्तूसारखे धुडकावून देतात. पण, याच गावातील एक तरुण या विश्वासघाताच्या प्रतिशोधासाठी क्रांतीची पताका खांद्यावर घेतो अन् आमगावचा स्वाभिमान जागृत करून स्वातंत्र्य लढ्याचा बिगुल फुंकतो, असे कथानक असलेल्या ‘खुर्द-बुद्रुक’या लघुपटाने आज रविवारी विदर्भवाद्यांच्या मनात एक नवीन ऊर्जा पेरली. निमित्त होते साई सभागृहात सादर झालेल्या या लघुपटाच्या स्पेशल प्रीमियरचे. जनमंच ही संस्था २०१३ पासून विदर्भाच्या प्रश्नांवर कार्य करीत आहे. विदर्भाच्या मागासलेपणाकडे लक्ष वेधण्यासाठी व वैदर्भीय नागरिकांमध्ये आपल्या हक्कांबाबत जनजागृती करण्याकरिता या संस्थेमार्फत सातत्याने विविध उपक्रम राबविले जातात. याच क्रमात ‘खुर्द-बुद्रुक’ या लघुपटाची निर्मिती करण्यात आली आहे. हा प्रीमियर सादर होण्याआधी ‘वेगळा विदर्भ, सक्षम विदर्भ’ या पुस्तिकेचे प्रकाशन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत वानखेडे, जनमंचचे सल्लागार प्रा. शरद पाटील, अध्यक्ष अॅड. अनिल किलोर, उपाध्यक्ष प्रमोद पांडे यांच्या हस्ते झाले. जनमंचची स्वतंत्र विदर्भाची चळवळ व या लघुपटाच्या निर्मितीबाबत अॅड. अनिल किलोर यांनी प्रास्ताविकातून सविस्तर माहिती दिली.
वेगळा विदर्भ भौगोलिक व आर्थिकदृष्ट्या कसा सक्षम आणि समृद्ध आहे याचे अभ्यासपूर्ण चित्र प्रा. शरद पाटील यांनी पॉवर पॉर्इंट प्रेझेंटेशनद्वारे सादर केले. यानंतर पडद्यावर निनादायला लागला ‘खुर्द-बुद्रुक’चा हुंकार. या लघुपटात आमगाव आणि खासगाव ही दोन गावे अनुक्रमे विदर्भ व पश्चिम महाराष्ट्रातील विकासात्मक फरक दर्शविणारी आहेत. अवघ्या ५० मिनिटांच्या या लघुपटात संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती होत असताना विकासाचे गाजर दाखवून विदर्भाला कसे फसविण्यात आले, याचा संतापजनक पूर्वेतिहास अतिशय अभ्यासपूर्ण पद्धतीने मांडला आहे. अस्सल वऱ्हाडी भाषा असलेल्या व वर्धा परिसरात चित्रीकरण झालेल्या या लघुपटात १५ कलावंतांच्या प्रमुख भूमिका आहेत. या लघुपटाचे दिग्दर्शक हरीश इथापे असून पटकथा व संवाद श्याम पेठकर यांचे आहेत. प्रीमियर सुरू असताना प्रेक्षकातून लागणारे ‘जय विदर्भ’चे नारे या लघुपटाची परिणामकारकता अधोेरेखित करीत होते.(प्रतिनिधी)
आंदोलन गीताचे स्वर अन् कलावंतांचा सत्कार
स्वतंत्र विदर्भाच्या मागणीची धार आणखी प्रखर करण्यासाठी व वैदर्भीय जनतेमध्ये आपल्या हक्काबाबत जनजागृती करण्यासाठी अॅड. अनिल किलोर यांचे बंधू राजेश किलोर यांनी ‘हा लढा विदर्भाचा विजयी, विराट होवो...’ हे स्फूर्तीदायक आंदोलन गीत रचले आहे. प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांचे निवेदन लाभलेल्या या गीताचे सादरीकरण या कार्यक्रमात करण्यात आले. याशिवाय खुर्द-बुद्रुक या लघुपटात अभिनय करणारे प्रा. दिलीप अलोणे, रूपराव कांबळी, श्रद्धा तेलंग, प्रवीण इंदू, मधू जोशी, सुनीता भोईकर, संहिता इथापे, महेश पवार व इतर सर्व कलावंतांचा यावेळी भावपूर्ण सत्कार करण्यात आला. भुसे नामक एका सेवानिवृत्त अधिकाऱ्यांनी आपल्या सेवानिवृत्तीचा निधी यावेळी विदर्भ आंदोलनाच्या चळवळीसाठी दिला. त्यांचेही या कार्यक्रमात विशेष अभिनंदन करण्यात आले.