सणासुदीत सोयाबीन तेल स्वस्त
By Admin | Updated: October 7, 2014 01:14 IST2014-10-07T01:14:02+5:302014-10-07T01:14:02+5:30
सणासुदीत किरकोळ बाजारपेठेत सोयाबीन तेल ७४ रुपयांवर पोहोचले असून, दीड महिन्यात प्रति किलोत ६ रुपयांची घसरण झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत भाव कमी झाल्याने गृहिणींना दिलासा मिळाला आहे.

सणासुदीत सोयाबीन तेल स्वस्त
महिन्यात ६ रु.ची घसरण : फल्ली तेल ९० रुपयांवर
नागपूर : सणासुदीत किरकोळ बाजारपेठेत सोयाबीन तेल ७४ रुपयांवर पोहोचले असून, दीड महिन्यात प्रति किलोत ६ रुपयांची घसरण झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत भाव कमी झाल्याने गृहिणींना दिलासा मिळाला आहे.
सोयाबीनची आवक मंदावली असली तरीही दीड महिन्यात तेल प्रति किलो ६ रुपयांनी घसरून भाव ७४ रुपयांवर आणि फल्ली तेल ५ रुपयांनी वधारून भाव ९० रुपयांवर गेले. दीड महिन्यांआधी सोयाबीन ८० रुपये आणि फल्ली तेल ८५ रुपयांवर होते. दोन्ही तेलाच्या भावात असलेला ५ रुपयांचा फरक आता १६ रुपयांवर गेला आहे.
इतवारीतील खाद्यतेल विक्रेते अनिलकुमार अग्रवाल यांनी सांगितले की, दिवाळीत खाद्यतेलाच्या विक्रीत दुपटीने वाढ होते. इतवारी बाजारपेठ विदर्भातील सर्वात मोठी आहे. दरदिवशी १० हजार टीनची (प्रति टीन १५ किलो) विक्री अर्थात १५ हजार किलो खाद्यतेल विकले जाते. त्यात १० टक्के फल्ली तर ९० टक्के सोयाबीन तेल विकले जाते. दिवाळीनंतर सोयाबीन आणि फल्लीची आवक वाढल्यानंतर भाव कमी होतील.
यंदा विदेशात सोयाबीनचे भरपूर उत्पादन आहे. सोयाबीनचे कच्चे तेल विदेशातून आयात केले जाते. त्यामुळे भाववाढीवर नियंत्रण येणार असल्याचे अग्रवाल यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)