नागपूर : लहान वयातच मधुमेहाचा सामना करीत असतानाच शिक्षणाच्या आघाडीवर यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा ‘ड्रीम ट्रस्ट’तर्फे सत्कार करण्यात आला. या सत्कारासोबतच ‘व्हायब्रंट’ युवा दिनदेखील साजरा करण्यात आला. याला विदर्भासोबतच छत्तीसगडसारख्या शेजारील राज्यातील विद्याथीर् उपस्थित होते.नागपूर येथील ‘ड्रीम ट्रस्ट’ व लंडन येथील पेंडसे ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ‘ड्रीम ट्रस्ट’चे कार्यक्रारी ‘ट्रस्टी’ डॉ.शरद पेंडसे यांनी यावेळी सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत केले व आयुष्यात शिक्षणाचे किती महत्त्व आहे याबद्दल मार्गदर्शन केले. मधुमेहामुळे निर्माण होणाऱ्या अडचणींचा सामना करत या विद्यार्थ्यांनी यश मिळविले आहे. त्यांचा पायाच संघर्षाचा आहे व भविष्यात त्यांना याचा फार उपयोग होईल, असे मत डॉ.पेंडसे यांनी व्यक्त केले. लंडन येथील पेंडसे ट्रस्टच्या अध्यक्षा लुसी लेकॉक या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपस्थित होत्या. लहान वयातच मधुमेह झालेल्या मुलांकडे पालकांनी योग्य लक्ष द्यायला हवे. वैद्यकीय उपचारांसोबतच त्यांचे चांगल्या पद्धतीने समुपदेशन झाले तर त्यांच्यामध्ये आत्मविश्वास जागविल्या जाऊ शकतो, असे त्या म्हणाल्या. ‘ड्रीम ट्रस्ट’शी जुळलेल्या मधुमेहग्रस्त रुग्णांसाठी १०० सायकली देण्याची घोषणा त्यांनी केली. दहावी, बारावी तसेच पदवी व पदव्युत्तर स्तरावरील २५ हून अधिक गुणवंत विद्यार्थ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. डॉ.संकेत पेंडसे व डॉ.कोतवाल यांनी प्रास्ताविक केल तर डॉ.अर्पिता पेंडसे यांनी आभार मानले.यावेळी ‘ट्रस्ट’च्या सल्लागार मंडळातील सदस्य व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)
मधुमेहावर मात करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
By admin | Updated: September 8, 2014 02:22 IST