बसपाला कार्यकर्त्यांच्या विद्रोहाची भीत
By Admin | Updated: February 3, 2017 02:50 IST2017-02-03T02:50:15+5:302017-02-03T02:50:15+5:30
महानगरपालिका निवडणुकीत बसपाला कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांकडून विद्रोह होण्याची भीती लक्षात घेता

बसपाला कार्यकर्त्यांच्या विद्रोहाची भीत
आज एबी फॉर्म वाटणार : कोणत्याही प्रकारची फूट नसल्याचा दावा
नागपूर : महानगरपालिका निवडणुकीत बसपाला कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांकडून विद्रोह होण्याची भीती लक्षात घेता पक्षाने गुरुवारी उमेदवारांची यादी घोषित केली नाही. बुधवारी बसपाच्या एका गटाने बाहेरच्या लोकांना उमेदवारी दिली जात असल्याने नाराज होऊन बहन मायावती विचार मंच स्थापन करून निवडणुकीत उतरण्याची घोषणा केली होती. या पार्श्वभूमीवर पक्षात विद्रोहाची भीती पक्षश्रेष्ठींना वाटत आहे. त्यामुळे आता शुक्रवारीच उमेदवारांना थेट एबी फॉर्म वाटप करून उमेदवारांची यादी जाहीर केली जाणार आहे.
बसपामधील एक गट पक्षाबाहेरील आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या लोकांना उमेदवारी दिली जात असल्याचे आरोप करीत आहे तर राज्यस्तरावरील पदाधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीने नाराज होऊन शहरातील काही कार्यकर्त्यांनी बहन मायावती विचार मंच स्थापन करून मनपा निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांचे स्पष्ट म्हणणे आहे की, आम्ही कांशीराम आणि मायावती यांच्याप्रति निष्ठावंत आहोत. परंतु निष्ठावंतांना डावलून बाहेरच्या लोकांना उमेदवारी देऊन नेते बसपाच्या चळवळीला हानी पोहोचवत आहे. संतप्त कार्यकर्ते उघडपणे समोर आल्याने बसपात खळबळ माजली आहे.
दुसरीकडे बसपाचे प्रदेश उपाध्यक्ष कृष्णा बेले यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे पक्षात कोणत्याही प्रकारची फूट नसल्याचा दावा केला आहे. इतकेच नव्हे तर त्यांनी बसपाचे प्रदेश सचिव रमेश लोखंडे आणि राजेंद्र पडोळे हे बसपासोबतच असल्याचे स्पष्टीकरणही दिले आहे. परंतु प्रदेश उपाध्यक्षांना हा खुलासा करण्याची वेळ का आली, याबाबत पक्षात वेगवेगळी चर्चा सुरू आहे.(प्रतिनिधी)