विद्यार्थ्यांच्या मनात भीती
By Admin | Updated: August 14, 2016 02:36 IST2016-08-14T02:36:09+5:302016-08-14T02:36:09+5:30
नागपूर विद्यापीठातील काही प्राध्यापक याच्या समर्थनात नव्हते. यामुळे वेळापत्रक बिघडेल तसेच

विद्यार्थ्यांच्या मनात भीती
नागपूर : नागपूर विद्यापीठातील काही प्राध्यापक याच्या समर्थनात नव्हते. यामुळे वेळापत्रक बिघडेल तसेच ‘चॉईस’ फार जास्त असल्यामुळे ते विषय शिकवायचे कसे असा त्यांचा प्रश्न होता. परंतु विद्यापीठ अनुदान आयोगाचेच निर्देश होते. त्यामुळे विद्यापीठाने या प्रणालीला डोळ्यासमोर ठेवून पावले उचलण्यास सुरुवात केली.मागील वर्षीपासून विद्यापीठाने विज्ञान शाखेतील पदव्युत्तर अभ्यासक्रमांना ही प्रणाली लागू केली. पहिल्या दोन सत्रांची परीक्षा ही कुठल्याही अडथळ्यांविना झाली. ही प्रणाली जरी मागील वर्षीपासून लागू झाली असली तरी प्रत्यक्षात विद्यार्थ्यांना आवडता विषय तिसऱ्या सत्रापासून निवडता येणार आहे. तिसऱ्या सत्रातील विद्यार्थ्यांना विद्यापीठाने त्यांचा ‘चॉईस’ कळविण्यास सांगितले होते. ‘चॉईस बेस्ड क्रेडिट’ प्रणालीच्या नियमांनुसार विद्यार्थी ‘फाऊंडेशन कोर्स’ म्हणजेच आवडत्या विषयासाठी कुठल्याही विद्याशाखेतील विषयाची निवड करू शकत होते. परंतु प्रत्यक्षात संपूर्ण विद्यापीठातील एकाही पदव्युत्तर विद्यार्थ्याने दुसऱ्या विद्याशाखेतील किंवा दुसऱ्या अभ्यासक्रमातील विषयाची निवड केलेली नाही. सर्वांनीच आपल्याच अभ्यासक्रमातील ‘आॅप्शनल’ विषय निवडला आहे.
एखाद्या अभ्यासक्रमात प्रवेश घेतल्यानंतर विद्यार्थ्यांना दुसऱ्या अभ्यासक्रमातील विषय शिकण्याची अनेकदा इच्छा असते. परंतु नागपूर विद्यापीठाचा विस्तार फार मोठा आहे. अशा स्थितीत विद्यार्थ्यांना ‘फाऊंडेशन कोर्स’चा अभ्यास करण्यासाठी दुसरा विभाग किंवा महाविद्यालयात जावे लागणार आहे. यात त्यांची तारांबळ उडण्याची शक्यता आहे. शिवाय इतर विभागात गेल्यावर ‘फाऊंडेशन कोर्स’ शिकविण्याची काय सोय आहे याची बहुतांश विद्यार्थ्यांना माहिती नाही. दुसऱ्या अभ्यासक्रमातील विषय निवडल्यानंतर शिकायलाच मिळाले नाही तर काय, ही भीती असल्यामुळेच विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमातील विषयांची निवड केली असावी, अशी माहिती एका विभागप्रमुखाने गोपनीयतेच्या अटीवर दिली.(प्रतिनिधी)