नागपुरातून ‘फॉल्कन‘चा ‘नोझ कोन’ फ्रान्सला रवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2019 00:39 IST2019-02-09T00:37:41+5:302019-02-09T00:39:19+5:30
फ्रान्सकडून राफेल युद्ध विमान खरेदी करारानुसार मिहानमध्ये सुरू झालेल्या दसॉल्ट रिलायन्स एअरोपेस या कारखान्यात ‘फॉल्कन-२०००’ या बिझनेस जेट विमानाच्या कॉकपिट समोरील भाग (नोझ कोन) तयार करण्यात आला. नोझ कोन शुक्रवारी कारखान्याच्या परिसरात झालेल्या एका समारंभात फ्रान्सच्या दसॉल्ट एव्हिएशनच्या अधिकाऱ्यांना निर्धारित वेळेपूर्वीच हस्तांतरित करण्यात आला. हा सुटा भाग फ्रान्समध्ये निर्मित फॉल्कन विमानांमध्ये बसविण्यात येणार असून फ्रान्सला रवाना करण्यात आला.

नागपुरातून ‘फॉल्कन‘चा ‘नोझ कोन’ फ्रान्सला रवाना
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : फ्रान्सकडून राफेल युद्ध विमान खरेदी करारानुसार मिहानमध्ये सुरू झालेल्या दसॉल्ट रिलायन्स एअरोपेस या कारखान्यात ‘फॉल्कन-२०००’ या बिझनेस जेट विमानाच्या कॉकपिट समोरील भाग (नोझ कोन) तयार करण्यात आला. नोझ कोन शुक्रवारी कारखान्याच्या परिसरात झालेल्या एका समारंभात फ्रान्सच्या दसॉल्ट एव्हिएशनच्या अधिकाऱ्यांना निर्धारित वेळेपूर्वीच हस्तांतरित करण्यात आला. हा सुटा भाग फ्रान्समध्ये निर्मित फॉल्कन विमानांमध्ये बसविण्यात येणार असून फ्रान्सला रवाना करण्यात आला.
या प्रसंगी रिलायन्स समूहाच्या ग्रुप सीएसआर चेअरमन टीना अंबानी, रिलायन्स कॅपिटलचे संचालक अंशुल अनिल अंबानी, महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सुरेश काकाणी, दसॉल्ट रिलायन्स एअरोस्पेस लि.चे (डीआरएएल) संचालक फेड्रिक लेहरम, अॅन्थोनी जेशुडॅसन, रिचर्ड लाऊड, डीआरएएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी संपतकुमारन एसटी, मुख्य कार्यान्वय अधिकारी रॉबर्ट, डीआरएएल आणि एमएडीसीचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
टीना अंबानी यांनी डीआरएएल नागपूरच्या युवा आणि तांत्रिक चमूचे अभिनंदन केले. पहिल्या कॉकपिटच्या नोझ कोनचे निर्मिती आंतरराष्ट्रीय एव्हिएशन स्टॅण्डर्डनुसार आणि वेळेपूर्वीच केली आहे. मिहान येथील कारखान्यात संपूर्ण पायाभूत सुविधा उपलब्ध असल्यामुळे संपूर्ण फॉल्कन-२००० विमानांची निर्मिती मिहान येथे व्हावी, अशी अपेक्षा आहे. नागपुरात तयार होणारे सुटे भाग एकत्र जोडून कॉकपिट तयार करण्यात येणार आहे.
मिहानमधील या कारखान्यात एप्रिल २०१८ पासून काम सुरू झाले. फॉल्कन- २००० या बिझनेस जेट विमानाचे एअरक्रॉफ्ट नोझ कोन तयार झाले आहेत. फ्रान्समध्ये फॉल्कन विमान सुसज्ज केले जाणार आहे. नागपुरात लवकरच सुटे भाग एकत्र जोडून कॉकपिट तयार करण्यात येणार आहे. मिहान-सेझमधील कारखान्यात २०२२ पर्यंत पूर्ण फॉल्कन विमान तयार होणार आहे. या कारखान्यात सध्या एक हँगर असून त्यात नोझ कोनचे उत्पादन सुरू आहे. येथे आणखी दोन हँगर तयार करण्यात येणार आहे.
गोपनीयरीत्या कार्यक्रमाचे उद्घाटन
कार्यक्रमाचे उद्घाटन गोपनीयरीत्या केल्यामुळे फ्रान्सच्या फॉल्कन-२००० विमानाच्या कॉकपिटसाठी लागणारा ‘नोझ कोन’ हा सुटा भाग मिहान-सेझमधील डीआरएएल कारखान्यात कमी वेळेत कसा तयार झाला, हा चर्चेचा विषय आहे. कारखान्याचे उद्घाटन झाले तेव्हा प्रसिद्धी माध्यमांना बोलविण्यात आले होते. पण कॉकपिटच्या सुट्या भागांच्या निर्मिती प्रक्रियेचे वृत्त गोपनीय ठेवले. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या अधिकाºयांनी ‘नोझ कोन’चे वृत्त प्रसिद्धी माध्यमांना रात्री उशिरा पाठविले.