फादर्स डे स्टोरी (दयानंद)
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:06 IST2021-06-20T04:06:47+5:302021-06-20T04:06:47+5:30
ऑटोचालक बापाची मेहनत : मुलगीही करतेय कॉम्प्युटर इंजिनिअरिंग नागपूर : धकाधकीच्या जीवनात दोन वेळच्या अन्नासाठी पायपीट करावी लागते. मग ...

फादर्स डे स्टोरी (दयानंद)
ऑटोचालक बापाची मेहनत : मुलगीही करतेय कॉम्प्युटर इंजिनिअरिंग
नागपूर : धकाधकीच्या जीवनात दोन वेळच्या अन्नासाठी पायपीट करावी लागते. मग मुलांना चांगले शिक्षण देणे अन् त्यांचे पालनपोषण करणे ही गरिबांच्या आवाक्याबाहेरची गोष्ट आहे. परंतु लष्करीबागमधील देवीदास दंदे यांनी सुरुवातीला सायकल रिक्षा नंतर ऑटो चालवून आपल्या मुलाला इंजिनियर बनविले असून त्यानी उपसलेले कष्ट फळाला आले आहेत.
देवीदास केशव दंदे (६१) हे लष्करीबागच्या आंबेडकर कॉलनीत राहतात. त्यांच्या कुटुंबात पत्नी, एक मुलगा आणि दोन मुली आहेत. ते सुरुवातीला सायकल रिक्षा चालवून घरगाडा चालवित होते. परंतु मुले हळुहळु मोठी होत होती. त्यांच्या शिक्षणाचा खर्च वाढू लागला. सायकल रिक्षा चालवून त्यांचा खर्च भागत नव्हता. अखेर जमा असलेल्या पैशातून आणि काही उसनवारी करून त्यांनी ऑटो विकत घेतला. परंतु आपल्या मुलांच्या शिक्षणात खंड पडू दिला नाही. घरखर्च, तीन मुले शिकणारी एवढा खर्च ऑटोतून मिळणाऱ्या कमाईतून चालविणे कठीण जात होते. परंतु त्यांनी धीर खचू दिला नाही. दिवसरात्र ऑटो चालवून पैसे कमविले. आता त्यांचा मुलगा शुभमने प्रियदर्शिनी अभियांत्रिकी महाविद्यालयातून चार वर्षांची सिव्हील इंजिनिअरिंगची पदवी पूर्ण केली आहे. त्यांची मोठी मुलगी श्रुती कॉम्प्युटर इंजिनिअरिंग करीत असून सर्वात लहान मुलगी पायल बारावीला शिकत आहे. आपल्या मेहनतीच्या भरवशावर मुलांना उच्च शिक्षण देऊन त्यांचे जीवन फुलविण्यासोबतच त्यांनी समाजातील इतरांसमोर आदर्श ठेवला आहे.
...............