मुलीवर बलात्कार करणाऱ्या बापाला २० वर्षे कारावास
By राकेश पांडुरंग घानोडे | Updated: March 27, 2023 18:46 IST2023-03-27T18:45:31+5:302023-03-27T18:46:01+5:30
Nagpur News पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधम बापाला सोमवारी २० वर्षे सश्रम कारावास व १० हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास एक वर्ष अतिरिक्त कारावास, अशी शिक्षा सुनावण्यात आली.

मुलीवर बलात्कार करणाऱ्या बापाला २० वर्षे कारावास
राकेश घानोडे
नागपूर : पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधम बापाला सोमवारी २० वर्षे सश्रम कारावास व १० हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास एक वर्ष अतिरिक्त कारावास, अशी शिक्षा सुनावण्यात आली. विशेष सत्र न्यायालयाचे न्या. आर. पी. पांडे यांनी हा निर्णय दिला. ही संतापजनक घटना उमरेड येथील आहे.
आरोपी व्यवसायाने मजूर आहे. त्याला दारुचे व्यसन होते. ३ मे २०२१ रोजी पीडित मुलीचे आजी-आजोबा लग्नासाठी बाहेरगावी गेले होते. आई, थोरला भाऊ व नराधम बाप हे घरी होते. आरोपी बाप सतत घराबाहेर जात होता व दारु पिऊन घरी परत येत होता. रात्री १० च्या सुमारास मुलीच्या आईचे व बापाचे भांडण झाले. बापाने आईला जबर मारहाण केली. त्यामुळे आई स्वत:ला वाचविण्यासाठी दोन्ही अपत्यांना सोबत घेऊन शेजारच्या घरी गेली. त्यानंतर रात्री सुमारे १२ च्या सुमारास बाप पीडित मुलीला बळजबरीने घरी गेऊन गेला. दरम्यान, त्याने मुलीवर बलात्कार केला. मुलीने दुसऱ्या दिवशी आईला याची माहिती दिली. आईने बापाला जाब विचारला असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे आईने मुलीला डॉक्टरकडे नेले. डॉक्टरने आवश्यक तपासण्या करून मुलीवर लैंगिक अत्याचार असल्याचे सांगितले. परिणामी, बापाविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. न्यायालयात सरकारच्या वतीने ॲड. आसावरी परसोडकर यांनी कामकाज पाहिले. पीडित मुलीने आरोपीविरुद्ध जबाब दिला नाही. परंतु, वैद्यकीय अहवालाच्या आधारावर आरोपीविरुद्धचा गुन्हा सिद्ध करण्यात आला.