वडिलास पेटवले
By Admin | Updated: January 13, 2017 02:09 IST2017-01-13T02:09:07+5:302017-01-13T02:09:07+5:30
आईशी काडीमोड घेण्याच्या तयारीत असलेल्या वडिलांसोबत भांडण करून तरुण मुलाने त्यांना पेटवून दिले.

वडिलास पेटवले
आईला काडीमोड देण्यावरून संतप्त : आरोपी मुलगा फरार
नागपूर : आईशी काडीमोड घेण्याच्या तयारीत असलेल्या वडिलांसोबत भांडण करून तरुण मुलाने त्यांना पेटवून दिले. हुकडेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी रात्री ९ च्या सुमारास ही थरारक घटना घडली. यात राजेंद्र ऊर्फ राजू वसंतराव जिचकार (वय ५६) भाजल्यामुळे गंभीर जखमी झाले.
जिचकार अमरावती जिल्ह्यातील सावंगी (ता. वरुड) येथील रहिवासी आहेत. त्यांचा मुलगा रॉकी ऊर्फ चंद्रशेखर नागपुरातील बेसा येथे राहतो. राजेंद्र जिचकार यांनी पत्नीसोबत पटेनासे झाल्यामुळे घटस्फोट घेण्यासाठी तिला वकिलामार्फत नोटीस पाठविली आहे. राजेंद्र जिचकार बुधवारी त्यांच्या मुलाकडे (रॉकी) नागपुरात आले होते. रात्री ९ वाजता बाप-लेकामध्ये आईला घटस्फोटाची नोटीस का पाठविली या कारणावरून वाद झाला. संतप्त झालेल्या रॉकीने त्याचा मित्र नितीन वाघाडे याच्यासोबत वडिलांच्या अंगावर रॉकेल ओतून त्यांना पेटवून दिले. आरडाओरड ऐकून शेजारची मंडळी धावली. त्यांनी राजेंद्र यांना विझविले. नंतर हुडकेश्वर ठाण्यात कळविण्यात आले. पोलिसांनी मेडिकलमध्ये दाखल असलेल्या राजेंद्र यांचे बयान घेतल्यानंतर आरोपी रॉकी आणि त्याचा मित्र नितीन या दोघांवर राजेंद्र यांना ठार मारण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला. आरोपींचा शोध घेतला जात आहे.(प्रतिनिधी)