सासरच्या मंडळींचा जावयावर हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 04:05 IST2021-03-29T04:05:07+5:302021-03-29T04:05:07+5:30
कौटुंबिक वादाचे पर्यवसान : पत्नीसह आठ आरोपींविरुद्ध गुन्हा लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कौटुंबिक वाद टोकाला गेल्यामुळे सासरच्या मंडळींनी ...

सासरच्या मंडळींचा जावयावर हल्ला
कौटुंबिक वादाचे पर्यवसान : पत्नीसह आठ आरोपींविरुद्ध गुन्हा
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कौटुंबिक वाद टोकाला गेल्यामुळे सासरच्या मंडळींनी जावयाच्या घरावर हल्ला चढविला. जावयाला आणि त्याच्या आई-वडिलांना मारहाण केली. विशेष म्हणजे, ७ मार्च रोजी दुपारी घडलेल्या या घटनेप्रकरणी पोलिसांनी २७ मार्चला गुन्हा दाखल केला.
कपिलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नारी मार्गावर संयोगनगर आहे. येथे प्रमित युवराज वालमंडे (वय ३२) राहतो. त्याचे आणि त्याची पत्नी स्नेहा या दोघांमधील मतभेद टोकाला गेले. त्यानंतर स्नेहाने प्रमितविरोधात मारहाण करून छळ करीत असल्याची तक्रार पोलिसांकडे नोंदविली. पोलिसांनी प्रमित विरुद्ध कलम ४९८ चा गुन्हा दाखल केला. त्यामुळे पती-पत्नीचे संबंध टोकाला गेले. या पार्श्वभूमीवर, स्नेहाच्या माहेरच्या मंडळीला प्रमित आणि त्याच्या आई-वडिलांनी चर्चा करण्यासाठी बोलावले होते. ७ मार्चला दुपारी १.३० वाजता स्नेहा, तसेच तिच्या माहेरचे विनोद बागडे, कल्पना विनोद बागडे, राहुल विनोद बागडे, प्रियंका महेशकर, चंचल ठाकूर, बाप्या ऊर्फ दुर्गेश रत्नाकर टिटे, आणि मनदिल रामकृष्ण सवईथुल हे परडी येथून प्रमितच्या घरी पोहोचले. तेथे त्यांच्यात वाद झाला. या वादानंतर सासरच्या मंडळींनी प्रमित, तसेच त्याच्या आई-वडिलांना शिवीगाळ करून मारहाण केली. आरोपींच्या ऑटोमध्ये तलवार होती. त्याचाही त्यांनी धाक दाखविला. या घटनेची तक्रार प्रमितने कपिलनगर पोलिसांकडे नोंदविली. पोलिसांनी प्रदीर्घ चौकशी केली. ही घटना घडल्याचे पुरावे मिळाल्यानंतर याप्रकरणी शनिवारी विविध कलमांनुसार उपरोक्त आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
---------------------------------------------------