सासऱ्याने सुनेला चौथ्या माळ्यावरून ढकलले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:07 IST2020-12-27T04:07:38+5:302020-12-27T04:07:38+5:30
हुडकेश्वरमधील घटना - पतीसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : लग्नात मनासारखे आंदण मिळाले नाही म्हणून ...

सासऱ्याने सुनेला चौथ्या माळ्यावरून ढकलले
हुडकेश्वरमधील घटना - पतीसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लग्नात मनासारखे आंदण मिळाले नाही म्हणून उच्चशिक्षित कुटुंबातील सासरच्या मंडळींनी अमानवीयतेचा कळस गाठला. लग्नानंतर अवघ्या चारच महिन्यात कॉम्प्युटर इंजिनिअर असलेल्या नवविवाहितेला सासऱ्याने इमारतीच्या चौथ्या माळ्यावरील बाल्कनीतून ढकलून तिची हत्या करण्याचा प्रयत्न केला. हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही धक्कादायक घटना घडली. करिश्मा साकेत तामगाडगे (वय २६) असे गंभीर जखमी झालेल्या विवाहितेचे नाव आहे.
न्यू नरसाळा मार्गावर शारदा कॉम्प्लेक्समध्ये राहणारा आरोपी साकेत भीमराव तामगाडगे सॉफ्टवेअर डेव्हलपर असून तो पुण्याच्या एका आयटी कंपनीत नोकरीला असल्याचे समजते. त्याचे वडील भीमराव तामगाडगे निवृत्त अधिकारी आहेत. ही मंडळी सुखवस्तू कुटुंबीय समजली जाते. करिश्मा कॉम्प्युटर इंजिनिअर आहे. साकेतसोबत करिश्माचे चार महिन्यांपूर्वी लग्न झाले. लग्नात मनासारखे आंदण मिळाले नाही म्हणून आरोपी साकेत, त्याचे वडील भीमराव, आई ललिता तसेच बहीण प्राची आणि तिचा नवरा राहुल हे सर्व करिश्माचा छळ करीत होते. २३ डिसेंबरला सायंकाळी ५ च्या सुमारास करिश्मा तिच्या चौथ्या माळ्यावरील सदनिकेच्या बाल्कनीत उभी असताना आरोपी सासऱ्याने तिला धक्का देऊन खाली पाडले. ती गंभीर जखमी झाली. दरम्यान, आरडाओरड ऐकून शेजारची मंडळी गोळा झाल्याने त्यांनी तिला सक्करदऱ्यातील खासगी इस्पितळात दाखल केले. चौथ्या माळ्यावरून पडल्याने करिश्माच्या दोन्ही पायांना जबर दुखापत झाली असून तिची प्रकृती गंभीर आहे. दरम्यान, या घटनेची माहिती डॉक्टरांनी हुडकेश्वर पोलिसांना दिली. त्यावरून पीएसआय पंकज लहाने यांनी करिश्माचे बयाण नोंदविले. त्यानंतर आरोपी साकेत, त्याचे वडील, आई आणि बहीण तसेच बहीण जावयाविरुद्ध हुंड्यासाठी छळ करून करिश्माला ठार मारण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला.
---
आरोपी फरार
या गंभीर घटनेमुळे न्यू नरसाळा भागात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी आरोपींना अटक करण्यासाठी शनिवारी त्यांचे घर गाठले. मात्र, आरोपींच्या घराला कुलूप आढळले. ते फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
---
माहेरची मंडळी व्यथित
लग्नापूर्वी हुंडा म्हणून काहीच नको असे म्हणत लॉकडाऊनच्या काळात आरोपी तामगाडगे कुटुंबीयांनी घाईघाईत लग्न जुळविले. लग्न झाल्यानंतर मात्र मनासारखे आंदण मिळाले नाही म्हणून त्यांनी करिश्माचा छळ सुरू केला आणि अवघ्या चारच महिन्यात तिचा जीव घेण्याचा प्रयत्न केल्याने तिच्या माहेरची मंडळी कमालीची व्यथित झाली आहे.
---