अमरावती रोडवर जीवघेणा प्रवास : दररोज होतात अपघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2019 22:55 IST2019-02-20T22:54:27+5:302019-02-20T22:55:44+5:30
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि नागपूर महापालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे नागपुरात हजारो वाहन चालकांना रोज मनस्ताप सहन करत स्वत:चा आणि कुटुंबीयांचा जीव धोक्यात घालावा लागत आहे. अमरावती रोडवरील विद्यापीठ कॅम्पस ते वाडी नाक्यापर्यंतच्या रस्त्याच्या दुरवस्थेचा फटका वाहनचालकांना बसतो आहे.

अमरावती रोडवर जीवघेणा प्रवास : दररोज होतात अपघात
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि नागपूर महापालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे नागपुरात हजारो वाहन चालकांना रोज मनस्ताप सहन करत स्वत:चा आणि कुटुंबीयांचा जीव धोक्यात घालावा लागत आहे. अमरावती रोडवरील विद्यापीठ कॅम्पस ते वाडी नाक्यापर्यंतच्या रस्त्याच्या दुरवस्थेचा फटका वाहनचालकांना बसतो आहे.
नागपूर शहरात सर्वात जास्त वाहन आणि प्रवासी अमरावती महामार्गातून नागपुरात प्रवेश करतात. अमरावतीपासून नागपूरच्या वाडीपर्यंतचा चार पदरी महामार्ग उत्कृष्ट आहे. मात्र, वाडीमधून नागपूर महापालिकेच्या हद्दीत हा महामार्ग येताच त्यावर खड्ड्यांची मालिकाच सुरू होते. गेल्या काही महिन्यात या रस्त्यावर अनेक वाहनचालकांचा अपघात होऊन ते जखमी झाले आहे. काहींना जीव ही गमवावा लागला आहे. विद्यापीठ कॅम्पसपासून वाडी नाक्यापर्यंतच्या रस्त्यावर कुठेही रात्रीची विद्युत व्यवस्था नसल्याने आणि दुभाजकाची निर्मिती अशास्त्रीय पद्धतीची असल्याने रात्रीच्या वेळी महामार्गाचा हा टप्पा वाहनचालकांना जणू यमराज सारखाच भासतो. एक महिनापूर्वी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि महापालिकेने अमरावती महामार्गाच्या दुरुस्तीचे काम सुरू केले. विद्यापीठ कॅम्पसकडून वाडी नाकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर अर्ध्या पट्याचे डांबरीकरण केले. अर्ध्या डांबरीकरणामुळे रस्त्याच्या मधोमध उंचसखल भाग तयार झाला आहे. त्यामुळे वाहनचालकांच्या दुचाकी त्यावरून घसरून अपघात होत आहे. रात्रीच्या वेळेला दुचाकी घसरून वाहनचालक जखमी झाले आहे. आठवड्याभरापूर्वी पोस्टल कॉलनी समोर एका दाम्पत्याचा असाच अपघात होऊन महिलेच्या मानेला गंभीर दुखापत झाली होती. दोन दिवसांपूर्वी हॉटेल हायवे ग्लोरीसमोर दुचाकी रस्त्याच्या उंचसखल भागावरून घसरल्याने दोघे जण जखमी झाले.
महापालिकेने काही आठवड्यापूर्वी या महामार्गावर विद्यापीठ कॅम्पसपर्यंत दुभाजकावर रिफ्लेकटर लावले. मात्र, त्यापुढच्या टप्प्यात अत्यंत धोकादायक दुभाजकाला रिफ्लेकटर न लावताच तसेच सोडून दिले.
वाडी, दत्तवाडी, डिफेन्स, आठवा मैल, गोंडखैरी, लावा दवलामेटी अशा परिसरातून रोज हजारो लोक शहरात येतात. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि महापालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे त्या सर्वांना रोज आपला जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे.