कॅन्सरशी लढा देणाऱ्या महिलांसाठी ‘फॅशन शो’
By Admin | Updated: March 1, 2016 02:58 IST2016-03-01T02:58:58+5:302016-03-01T02:58:58+5:30
कॅन्सरवर मात करीत नव्या उमेदीने जीवन जगणाऱ्या महिला व लहान मुलांसाठी ‘रणरागिणी’ फॅशन शो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

कॅन्सरशी लढा देणाऱ्या महिलांसाठी ‘फॅशन शो’
देवता लाईफ फाऊंडेशन : मुग्धा गोडसे येणार
नागपूर : कॅन्सरवर मात करीत नव्या उमेदीने जीवन जगणाऱ्या महिला व लहान मुलांसाठी ‘रणरागिणी’ फॅशन शो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. देवता लाईफ फाऊंडेशनच्या वतीने ही स्पर्धा ५ मार्च रोजी दुपारी १२.३० वाजता सिव्हिल लाईन्स येथील वसंतराव देशपांडे सभागृहात होईल. या कार्यक्रमाला प्रसिद्ध अभिनेत्री व मॉडेल मुग्धा गोडसे उपस्थित राहणार आहे.
जीवघेण्या कॅन्सरवर मात करून आपल्या आयुष्यात नवी चेतना जागृत करून समाजापुढे एक नवा आदर्श प्रस्थापित करणाऱ्या विविध वयोगटातील महिला या ‘फॅशन शो’मध्ये सहभागी होणार आहेत. अगदी लहान वयात कॅन्सरशी झुंज देणाऱ्या लहान मुलांचाही या ‘शो’मध्ये समावेश असणार आहे. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या या स्पर्धकांचे मनोबल वाढविण्यासाठी मुग्धा गोडसे उपस्थित राहणार आहे. नवी उमेद देऊन जगणाऱ्या लोकांना आनंदाचे काही क्षण देणे तसेच समाजाकडून त्यांचे कौतुक व्हावे व त्यांचा आत्मविश्वास द्विगुणित व्हावा या उद्देशाने फाऊंडेशनने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमासाठी देवता लाईफ फाऊंडेशनचे पदाधिकारी किशोर बावणे, सुधीर बाहेती, डॉ. कृष्णा कांबळे, डॉ. उषा साकुरे, नीलिमा बावणे, डॉ. सतीश देवळे, धनश्री गांधारे, रश्मी माजगावकर आदी परिश्रम घेत आहेत. या ‘शो’ची कोरियोग्राफी हर्षा झारिया यांनी केली असून वस्त्रालंकाराची संकल्पना निधी गांधी यांची आहे. (प्रतिनिधी)