पूलावरील पाण्यामुळे शेतकरी त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:07 IST2021-06-20T04:07:44+5:302021-06-20T04:07:44+5:30

भिवापूर : कारगाव-वासी नदी पात्रावरील पुलाच्या पायल्यांमध्ये काटेरी झुडूपे आणि कचरा अडकल्याने पाण्याचा वाहता प्रवाह थांबला आहे. त्यामुळे नदीला ...

Farmers suffer due to water on the bridge | पूलावरील पाण्यामुळे शेतकरी त्रस्त

पूलावरील पाण्यामुळे शेतकरी त्रस्त

भिवापूर : कारगाव-वासी नदी पात्रावरील पुलाच्या पायल्यांमध्ये काटेरी झुडूपे आणि कचरा अडकल्याने पाण्याचा वाहता प्रवाह थांबला आहे. त्यामुळे नदीला पूर येत असून वाहतूक ठप्प होत आहे. वारंवार उद्भवणाऱ्या या समस्येची दखल घेऊन प्रशासनाने पुलाच्या पायल्या तात्काळ स्वच्छ कराव्यात, अशी मागणी दोन्ही गावातील नागरिकांनी केली आहे.

तालुक्यातील कारगाव व वासी या दोन गावांना जोडणाऱ्या मार्गावर मरू नदी आहे. शिवाय खैरगावकडून वाहत येणाऱ्या अन्य एका नदीचा संगमही याच ठिकाणी होतो. त्यामुळे या नदीचे पात्र विस्तीर्ण असून त्यावर अंदाजे १० ते १२ पायल्यांचा पूल उभा आहे. गतवर्षी पासून नदीपात्राची व पुलाच्या पायल्यांची स्वच्छता करण्यात आलेली नाही. अशातच आठवडाभरापासून पाऊस सुरू असल्यामुळे नदीपात्रातील पाण्याच्या प्रवाहासोबत वाहत आलेली काटेरी झुडूपे व कचरा मोठ्या प्रमाणात पुलाच्या पायल्यांमध्ये अडकला आहे. पाणी वाहून जाण्यासाठी जागाच नसल्याने नदीपात्रातील पाणी पुलाच्या वरून वाहत असून त्यामुळे वाहतूकही ठप्प आहे.

शेतीचा हंगाम सुरू आहे. अशात शेतकऱ्यांना शेतात कामासाठी, खते व बियाणे खरेदीसाठी तालुकास्थळी जावे लागते. पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे ग्रामस्थांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे पायल्यांमध्ये अडकलेली काटेरी झुडूपे काढून नदीपात्र स्वच्छ करण्याची मागणी वासी येथील सोनबा मेश्राम, शेषराव भोयर, प्रभाकर मानकर, आशिष राऊत, अविनाश राऊत, अधिकरण तिडके, दिगांबर वानखेडे, चेतन मेश्राम, गोकुळ भोयर, रवींद्र इंगळे आदींनी केली आहे.

Web Title: Farmers suffer due to water on the bridge