दिल्लीतील शेतकरी आंदोलनातील सहभागासाठी शेतकरी रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:07 IST2021-01-04T04:07:13+5:302021-01-04T04:07:13+5:30

नागपूर : दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी राज्यभरातील शेतकऱ्यांचा जत्था रविवारी नागपुरातून दिल्लीकडे रवाना झाला. तत्पूर्वी ...

Farmers leave for Delhi to participate in the farmers' movement | दिल्लीतील शेतकरी आंदोलनातील सहभागासाठी शेतकरी रवाना

दिल्लीतील शेतकरी आंदोलनातील सहभागासाठी शेतकरी रवाना

नागपूर : दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी राज्यभरातील शेतकऱ्यांचा जत्था रविवारी नागपुरातून दिल्लीकडे रवाना झाला. तत्पूर्वी संविधान चौकात सभा झाली, त्यानंतर वाहनांनी हे महिला-पुरुष शेतकरी सावनेरमार्गे रवाना झाले.

अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती व महाराष्ट्र राज्य किसान सभेच्यावतीने सायंकाळी ५ वाजता शेतकरी नेते श्याम काळे यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. व्यासपीठावर सिटूचे शिवकुमार गणवीर, धारावी मुंबई येथील कम्युनिस्ट पक्षाचे नेते प्रकाश रेड्डी, तुकाराम भस्मे, ढासाळा (जि. परभणी) येथील शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील महिला सविता जाधव, राष्ट्रीय सचिव नामदेव गावडे, परभणी येथील माणिक कदम, नागदेव ढवळे, प्रशांत पवार आदी उपस्थित होते. या नेत्यांनी सभेमध्ये मार्गदर्शन केले. प्रास्ताविक समन्वयक राजन क्षीरसागर यांनी तर संचालन अरुण बनकर यांनी केले.

...

राज्यभरातील शेतकरी दाखल

नियोजनानुसार, दिल्लीतील आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आणि सहभागी होण्यासाठी राज्याच्या विविध भागातील शेतकरी दुपारपासून नागपुरात पोहचणे सुरू झाले होते. यात मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, अहमदनगर, नाशिक येथील शेतकऱ्यांचा समावेश आहे. सायंकाळी सभेनंतर ही किसान यात्रा रवाना झाली. सावनेरमध्ये रात्रीच्या मुक्कामानंतर ही शेतकरी यात्रा इंदोर, कोटा, जयपूर मार्गे शहजहापूर येथे पोहचल्यावर दिल्लीच्या सीमेवरील आंदोलनात सहभागी होणार आहे.

...

केंद्र सरकारने केलेले कायदे अन्यायकारक असल्याने ते रद्द करावे यासाठी शांततापूर्ण मार्गाने आंदोलन सुरू आहे. मात्र सरकार हे आंदोलन दडपून टाकण्यासाठी रोज प्रयत्न करीत आहे. तिन्ही कायदे रद्द होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील, त्या आंदोलनाला ताकद देण्यासाठीच महाराष्ट्रातील शेतकरी जात आहेत. या आंदोलनाची धार आम्ही मजबूत करू.

- श्याम काळे, शेतकरी नेते

...

संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनासाठी जशी ताकद निर्माण केली होती, तीच ताकद किसान संघर्ष यात्रेच्या माध्यमातून दिल्लीत दाखवून देऊ. शेतकऱ्यांच्या दमनाविरूद्ध आम्ही सारे एकत्र आलो आहोत. शेतकऱ्यांच्या मागण्या रास्त आहेत. त्या पूर्ण करण्यासाठी आम्ही अखेरपर्यंत दिल्लीत लढा देऊ.

- प्रकाश रेड्डी, कम्युनिस्ट नेते, धारावी, मुंबई

...

रविनगर चौकात स्वागत

गंगाखेड येथून निघालेली किसान संघर्ष यात्रा नागपुरात पोहचल्यावर नागपुरातील जय जवान जय किसान संघटनेच्यावतीने रविनगर चौकात स्वागत करण्यात आले. शेतकऱ्यांना चहापान देण्यात अले. त्यानंतर जत्था घोषणा देत सभास्थळी पोहचला. नाशिकमधील शेतकऱ्यांसोबत ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनचे कार्यकर्तेही डफासह दाखल झाले आहेत. परभणी येथील जत्थ्यामध्ये आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील २६ महिलांचा समावेश आहे.

...

...

Web Title: Farmers leave for Delhi to participate in the farmers' movement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.