शेतकऱ्यांचे बजेट ‘गड’बडले!

By Admin | Updated: March 1, 2016 02:34 IST2016-03-01T02:34:13+5:302016-03-01T02:34:13+5:30

वित्तमंत्री अरुण जेटली यांचा अर्थसंकल्प ग्रामीण अर्थव्यवस्थेला दिलासा देणारा असला तरी दोन दिवसांपासून सुरु असलेल्या गारांच्या मारामुळे शेतकऱ्यांचे बजेट यंदा निश्चितच गडबडणार आहे.

Farmer's budget 'fort'! | शेतकऱ्यांचे बजेट ‘गड’बडले!

शेतकऱ्यांचे बजेट ‘गड’बडले!

गारपिटीचा तडाखा रबी पिके जमीनदोस्त गहू काळवंडणार
नागपूर : वित्तमंत्री अरुण जेटली यांचा अर्थसंकल्प ग्रामीण अर्थव्यवस्थेला दिलासा देणारा असला तरी दोन दिवसांपासून सुरु असलेल्या गारांच्या मारामुळे शेतकऱ्यांचे बजेट यंदा निश्चितच गडबडणार आहे. जिल्ह्यातील काटोल, भिवापूर, उमरेड, नरखेड, कळमेश्वर, सावनेर, पारशिवनी, हिंगणा तालुक्यातील बहुतांश भागाला रविवारी मध्यरात्रीनंतर अवकाळी पावसाचा तडाखा बसला. बहुतांश गावांमध्ये गारपीट झाल्याने रबी पिकांसह भाजीपाल्याचे नुकसान झाले. सोमवारी दुपारच्या सुमारास पुन्हा जिल्ह्यात सर्वत्र गारपिटीचा तडाखा बसला. सोसाट्याचा वारा आणि लिंबू व आवळ्याच्या आकारातील गारपिटीमुळे रबी पिकांचे अतोनात नुकसान झाले.
अवकाळी पावसामुळे कपाशी, हरभरा व गव्हाला सर्वाधिक फटका बसला असून गहू काळवंडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शहरातही वादळामुळे होर्डिंग्जची पडझड झाली.
काटोल, भिवापूर, नरखेड, कुही, उमरेड, हिंगणा शहरासह परिसरात सोमवारी पहाटेच्या वादळासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर दुपारपर्यंत सर्वत्र ढगाळी वातावरण होते. दरम्यान, दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास वादळी वाऱ्यासह गाराही पडायला सुरुवात झाली. हा पाऊस अंदाजे अर्धा ते पाऊण तास सुरू होता. त्यामुळे शहरांसह ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले होते. काटोल तालुक्यातील रिधोरा, येनवा, डोंगरगाव, खानगाव, कारला, वाढोणा, गोन्ही, खुटांबा, लाडगाव, खंडाळा आदी गावांमध्ये गारपिटीचा प्रचंड फटका बसला. लिंबू व आवळ्याच्या आकाराच्या गारांमुळे गहू, हरभरा, संत्रा, मोसंबी व भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. कुही शहरासह तालुक्यातील साळवा, चापेगडी, मांढळ व इतर भागात जोरदार वादळासह अवकाळी पाऊस पडला. कळमेश्वर, सावनेर परिसरात दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास जोरदार वादळी पावसाला सुरुवात झाली. विजांच्या कडकडाटामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. हा प्रकार एक तास सुरू होता. गुमगाव, धामणा, टाकळी भन्साळी, नांदागोमुख, रिधोरा परिसरात पावसासह गारपीट झाली. तसेच भिवापूर तालुक्यातील नांद, भगवानपूर, महालगाव, बेसूर परिसरात वादळी पावसासह गारा बरसल्या. कोंढाळी परिसरात सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास जोरदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे प्रवाशांसह इतर नागरिकांची तारांबळ उडाली होती. अवकाळी पावसामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून, वातावरणात अचानक गारवा निर्माण झाला आहे.(प्रतिनिधी)

Web Title: Farmer's budget 'fort'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.