शेतकऱ्यांनो ‘अर्ज करा कर्ज घ्या’
By Admin | Updated: June 6, 2015 02:16 IST2015-06-06T02:16:39+5:302015-06-06T02:16:39+5:30
शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी दरवर्षीच त्रास सहन करावा लागतो. परंतु यंदा हा त्रास होणार नाही. कारण खुद्द

शेतकऱ्यांनो ‘अर्ज करा कर्ज घ्या’
नागपूर : शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी दरवर्षीच त्रास सहन करावा लागतो. परंतु यंदा हा त्रास होणार नाही. कारण खुद्द जिल्हाधिकाऱ्यांनी यासाठी पुढाकार घेतला असून प्रत्येक शेतकऱ्याला कर्ज उपलब्ध व्हावे म्हणून तालुकास्तरावर कर्ज सुविधा समितीची स्थापना केली आहे. या समितीमध्ये कर्ज वितरणाशी संबधित सर्व घटक एकाच ठिकाणी उपलब्ध राहणार आहे. त्यामुळे ‘अर्ज करा आणि कर्ज घ्या’, अशी सुविधा शेतकऱ्यांना प्राप्त होणार आहे.
जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी स्वत: या योजनेविषयी शुक्रवारी पत्रपरिषदेत सविस्तर माहिती दिली. त्यांनी सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: खरीप आढावा बैठक घेतली होती. तेव्हा प्रत्येक शेतकऱ्याला कर्ज सुलभपणे मिळावे, असे निर्देश दिले होते. आता खरीप हंगामाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पीक कर्जाची आवश्यकता पडेल. शेतकऱ्यांना सहजपणे कर्ज उपलब्ध व्हावे, यासाठी प्रत्येक तालुकास्तरावर कर्ज सुविधा समिती स्थापन करण्यात आली आहे. तहसीलदार हे या समितीचे अध्यक्ष राहतील. तर तालुका कृषी अधिकारी, ब्लॉक लेवल बँकर्स कमिटीचे समन्वयक, सहायक निबंधक, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे निरीक्षक आणि राष्ट्रीयकृत बँकांचे प्रतिनिधी हे सदस्य राहतील.
दर आठवड्यात सोमवार आणि शुक्रवार असे दोन दिवस दुपारी ३ ते सायंकाळी ६ या वेळात या समितीची तालुकास्तरावरील तहसील कार्यालयात बैठक होईल. या बैठकीत ज्या शेतकऱ्यांना कर्ज हवे असेल त्यांनी अर्ज करावा. कर्ज वितरणाशी संबंधित सर्व घटक या समितीमध्ये असल्याने त्यांच्या अर्जावर लगेच निर्णय घेऊन त्यांना कर्ज उपलब्ध करून दिले जाईल.
जिल्हाधिकारी कुर्वे यांनी सांगितले की, शासनाने ८४० कोटी रुपये कर्ज वितरणाचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. ते आम्ही पूर्ण करूच परंतु कुठलाच गरजू शेतकरी कर्जापाून वंचित राहू नये. नवीन शेतकऱ्यांनाही कर्ज उपलब्ध व्हावे, या उद्देशाने कर्ज सुविधा समिती स्थापन केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे. (प्रतिनिधी)
गेल्यावर्षीच्या थकीत कर्जदारांना विशेष सवलत
४गेल्यावर्षीची नैसर्गिक आपत्ती आणि पीक परिस्थिती लक्षात घेऊन शासनाने गेल्यावर्षी कर्ज घेणारे परंतु काही कारणास्तव कर्ज चुकते न करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी पहिल्यांदाच विशेष सवलत दिली आहे. या विशेष सवलती अंतर्गत गेल्यावर्षी कर्ज घेणारे थकीत कर्जदार शेतकरी सुद्धा यंदा कर्ज घेऊ शकतील. त्यांना थकीत कर्जाची रक्कम ही पाच वर्षात टप्प्याटप्प्याने फेडता येईल. परंतु ही सवलत केवळ गेल्यावर्षीच्या थकीत कर्जदार शेतकऱ्यांसाठीच आहे. अनेक वर्षांपासून कर्ज न फेडणाऱ्या शेतकऱ्यांना ही सवलत मिळणार नाही, असेही जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी स्पष्ट केले आहे.