बियाणांच्या लाभासाठी महाडीबीटी पोर्टलवर शेतकरी योजना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:07 IST2021-05-12T04:07:43+5:302021-05-12T04:07:43+5:30
नागपूर : शेतकऱ्यांना बियाणांचा लाभ घेण्यासाठी कृषी विभागाने महाडीबीटीवर शेतकरी योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या सोयीकरिता सर्व ...

बियाणांच्या लाभासाठी महाडीबीटी पोर्टलवर शेतकरी योजना
नागपूर : शेतकऱ्यांना बियाणांचा लाभ घेण्यासाठी कृषी विभागाने महाडीबीटीवर शेतकरी योजना सुरू केली आहे.
या योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या सोयीकरिता सर्व योजनांचा लाभ एकाच अर्जाद्वारे देण्याच्या दृष्टीने अर्ज करण्यापासून ते प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंत एकात्मिक संगणकीय प्रणाली विकसित केली आहे. या प्रणालीद्वारे शेतकऱ्यांना त्यांच्या पसंतीच्या निवडीचे स्वातंत्र्य देण्यात आले असून, शेतकऱ्यांना शेतीशी संबंधित विविध बाबींकरिता या माध्यमातून अर्ज करता येणार आहे.
या सुविधेअंतर्गत लाभार्थींना राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान या योजनेतील सोयाबीन, भात, तूर, मूग, उडीद, मका, बाजरी आदी बियाणे अनुदानावर उपलब्ध होणार आहेत. यासाठी १५ मेपर्यंत शेतकऱ्यांना यावर अर्ज करावयचा आहे. महाडीबीटी पोर्टलचे https://mahadbtmahait.gov.in हे संकेतस्थळ आहे. स्वत:च्या मोबाइल, लॅपटॉप किंवा यावरील सामुदायिक सेवा केंद्रावर जाऊन संकेतस्थळावरून ‘शेतकरी योजना’ हा पर्याय निवडून शेतकरी या योजनेत सहभागी होऊ शकतात. ‘वैयक्तिक लाभार्थी’ म्हणून नोंदणी करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांचा आधार क्रमांक संकेतस्थळावर प्रमाणित करून घ्यावा लागेल. आधार क्रमांक नसेल त्यांनी प्रथम आधार नोंदणी केंद्राकडे जाऊन त्यांची नोंदणी करावी. तो नोंदणी क्रमांक महाडीबीटी पोर्टलमध्ये नमूद करून त्यांना योजनांसाठी अर्ज करता येईल. अधिक माहितीसाठी नजीकच्या कृषी अधिकाऱ्यांकडे संपर्क साधवा, अशी माहिती कृषी आयुक्त धीरज कुमार यांनी दिली आहे.