शेतकऱ्यास बेदम मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:08 IST2021-07-11T04:08:04+5:302021-07-11T04:08:04+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क भिवापूर : शेताच्या धुऱ्यावर काट्या टाकल्यावरून दाेन आराेपींनी एका शेतकऱ्याला बेदम मारहाण केली. त्यात शेतकऱ्याच्या पायाला ...

शेतकऱ्यास बेदम मारहाण
लाेकमत न्यूज नेटवर्क
भिवापूर : शेताच्या धुऱ्यावर काट्या टाकल्यावरून दाेन आराेपींनी एका शेतकऱ्याला बेदम मारहाण केली. त्यात शेतकऱ्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. ही घटना तालुक्यातील चाेरविहिरा येथे शुक्रवारी (दि.९) सायंकाळी ४.३० वाजताच्या सुमारास घडली. दरम्यान, पाेलिसांनी दाेघांविरुद्ध गुन्हा नाेंदविला असून, कारवाई सुरू केली आहे.
शेषराव रंदई व लीलाधर चाैधरी दाेन्ही रा. चाेरविहिरा, ता. भिवापूर, अशी आराेपींची नावे असून, मारुती चिंधू खाटे (५५, रा. चाेरविहिरा, ता. भिवापूर) असे जखमी शेतकऱ्याचे नाव आहे. शुक्रवारी मारुती खाटे हे आपल्या शेतात काम करीत हाेता. वन्यप्राण्यांकडून पिकाचे नुकसान हाेऊ नये म्हणून त्यांनी शेताच्या धुऱ्यावर काट्या टाकल्या. दरम्यान सायंकाळी ४.३० वाजताच्या सुमारास दाेन्ही आराेपींनी तेथे येऊन रस्त्याचा वाद उकरून काढत, धुऱ्यावर काट्या टाकल्यावरून वाद घातला. अशात आराेपींनी खाटे यांना मारहाण करायला सुरुवात केली. आराेपींनी कुऱ्हाडीच्या दांड्याने मारहाण केल्याने खाटे यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली. रक्तबंबाळ अवस्थेत जखमी शेतकऱ्यास भिवापूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र पायाला फ्रॅक्चर असल्याने प्राथमिक उपचारानंतर त्यांना नागपूरला हलविले. याप्रकरणी भिवापूर पाेलिसांनी आराेपींविरुद्ध भादंवि कलम ३२४, ३२५, ५०४, ५०६, ३४ अन्वये गुन्हा नाेंदविला असून, आराेपींचा शाेध सुरू केला आहे. ठाणेदार महेश भाेरटेकर यांच्या मार्गदर्शनात गुन्ह्याचा पुढील तपास उपनिरीक्षक प्रकाश चंगाेले करीत आहेत.