हिमाचल दुर्घटनेत मृत प्रतीक्षाला जन्मगावी निरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:09 IST2021-07-28T04:09:18+5:302021-07-28T04:09:18+5:30

नागपूर : हिमाचल प्रदेशातील किन्नोर जिल्ह्यात सांगला-चितकल मार्गावर दोन दिवसांपूर्वी दरड कोसळली. त्यात ९ पर्यटकांचा मृत्यू झाला. यात मध्यप्रदेशातील ...

Farewell to the dead waiting in the Himachal accident | हिमाचल दुर्घटनेत मृत प्रतीक्षाला जन्मगावी निरोप

हिमाचल दुर्घटनेत मृत प्रतीक्षाला जन्मगावी निरोप

नागपूर : हिमाचल प्रदेशातील किन्नोर जिल्ह्यात सांगला-चितकल मार्गावर दोन दिवसांपूर्वी दरड कोसळली. त्यात ९ पर्यटकांचा मृत्यू झाला. यात मध्यप्रदेशातील बैतूल जिल्ह्यातील सारणी ठाणा क्षेत्रातील पाथाखेडा येथील उच्चशिक्षित तरुणी प्रतीक्षा पाटील हिचा समावेश होता. प्रतीक्षा मूळची नागपूरची आहे. तिच्यावर मंगळवारी मानकापूर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

वेस्टर्न कोल फिल्ड (वेकोलि) पाथाखेडा येथे एका खाणीत प्रतीक्षाचे वडील सुनील पाटील हे मॅनेजर आहेत. त्यांची मुलगी प्रतीक्षा (२७) हिने आयआयटी खडकपूर येथून बी-टेक व एम-टेक केले. नुकतीच तिने पुण्यातील कंपनी सोडली होती. तिला उच्च शिक्षणासाठी स्पेनला जायचे होते. प्रतीक्षाला निसर्गाच्या सानिध्यात रहायला आवडत होते. यंदा प्रतीक्षाने हिमाचलचे पर्यटन करण्याचे ठरविले. परंतु पावसाळा असल्याने आईने तिला काहीसा नकारही दिला, तरीही मुलीची इच्छा पूर्ण करण्यासाठी तिला परवानगी दिली. घटनेच्या दिवशी दुपारी प्रतीक्षा चारचाकी वाहनात पर्यटकांसोबत किन्नोर जिल्ह्यातील सांगला-चितकल मार्गावरून जात असताना आईसोबत व्हिडिओ कॉल करून परिसरातील निसर्गाचे दृश्य दाखवीत होती.... पण अचानक प्रतीक्षाचा कॉल कट झाला. त्यानंतर आईने प्रतीक्षाला बरेच कॉल लावले परंतु प्रतिसाद मिळाला नाही. सायंकाळी हिमाचल पोलिसांंनी फोन करून कळविले की बटसेरीजवळ दरड कोसळल्याने मोठमोठे दगड गाडीवर पडले. त्यामुळे ९ पर्यटकांचा मृत्यू झाला. त्यात प्रतीक्षाचाही समावेश आहे.

सुनील पाटील यांनी सांगितले की प्रतीक्षाचे पार्थिव विमानाने दिल्लीहून दुपारी नागपुरात आणले. नागपुरातील मानकापूर घाटावर तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Web Title: Farewell to the dead waiting in the Himachal accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.