प्रसिद्ध आर्किटेक्ट आनंद गोडसे यांचे निधन
By Admin | Updated: June 4, 2017 01:49 IST2017-06-04T01:49:50+5:302017-06-04T01:49:50+5:30
मध्य भारतातील सुप्रसिद्ध आर्किटेक्ट आनंद दत्तात्रय गोडसे यांचे शनिवारी हृदयविकाराने निधन झाले.

प्रसिद्ध आर्किटेक्ट आनंद गोडसे यांचे निधन
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मध्य भारतातील सुप्रसिद्ध आर्किटेक्ट आनंद दत्तात्रय गोडसे यांचे शनिवारी हृदयविकाराने निधन झाले. ते ७५ वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी मीना गोडसे, मुलगा गौरव, मुलगी अश्विनी चौबळ आणि मोठा आप्तपरिवार आहे. हिंदुस्तान कॉलनी वर्धा रोड येथील त्यांच्या राहत्या घरून अंत्ययात्रा निघाली. सायंकाळी ४.३० वाजता मोक्षधाम घाट येथे शोकाकूल वातावरणात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
आनंद गोडसे हे प्रसिद्ध आर्किटेक्ट होते. त्यांनी बडोदा येथून आर्किटेक्टची पदवी संपादन केली. त्यांनी हॉलंड विद्यापीठाचा प्रतिष्ठेचा आयसीएचपीबी डिप्लोमा मिळविला होता. यासाठी त्यांना शिष्यवृत्ती मिळाली होती. भारतातील काहीच लोकांना ही शिष्यवृत्ती मिळाली आहे. ४५ वर्षाच्या आपल्या करिअरमध्ये त्यांनी अनेक लक्षवेधी इमारती उभ्या केल्या आहेत. यामध्ये कामठी येथील जगप्रसिद्ध ड्रॅगन पॅलेस टेम्पलचा समावेश आहे. त्यांनी आपल्या यशस्वी कारकिर्दीत आॅटोमोबाईल इमारती, रुग्णालये, शैक्षणिक संस्थांच्या इमारती, स्पोटर््स कॉम्प्लेक्स, औद्योगिक इमारतींचे डिझाईन केले आहेत.
ते खेळप्रेमी होते. सर्वांना शिक्षण मिळावे, यावर त्यांचा विश्वास होता. सामाजिक उपक्रमांतर्गत गोडसे यांनी स्पोटर््स, खेळ आणि शैक्षणिक संस्थांना सवलतीच्या दरात आपली सेवा दिली. यामध्ये हनुमान व्यायाम शाळा प्रसारक मंडळ स्टेडियम व स्विमींग पूल, आणि विदर्भातील अनेक नामांकित एनजीओला सेवा प्रदान केली. त्यांनी अनेक गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत केली. त्यांना प्राचीन इतिहास व साहित्याची आवड होती.