रोहयो कामांसाठी कुटुंबनिहाय सर्वेक्षण होणार
By Admin | Updated: August 7, 2014 22:57 IST2014-08-07T20:43:26+5:302014-08-07T22:57:00+5:30
मजुरांचीही मदत घेणार : रोजगार सेवक नोंदविणार कामांची मागणी

रोहयो कामांसाठी कुटुंबनिहाय सर्वेक्षण होणार
अकोला: महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत कामांची मागणी नोंदविण्यासाठी आता राज्यभरात कुटुंबनिहाय सर्वेक्षण करण्यात येणार आहे. या सर्वेक्षणात ग्राम रोजगार सेवकांकडून कुटुंबनिहाय कामांची मागणी नोंदविण्यात येणार आहे.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत सन २0१५-१६ चे लेबर बजेट तयार करताना, कामांची मागणी वास्तवावर आधारित असावी, यासाठी राज्य शासनाच्या नियोजन विभागामार्फत गत ४ ऑगस्ट रोजी परिपत्रक काढण्यात आले. त्यानुसार विशिष्ट प्रवर्गातील कुटुंबांच्या प्रत्येक घराला भेट देऊन, कामाची मागणी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या जमाती, विमुक्त जमाती, दारिद्रयरेषेखालील कुटुंब, स्त्री कर्ता असलेली कुटुंब, शारीरिकदृष्ट्या विकलांग व्यक्ती कर्ता असलेली कुटुंब, जमीन सुधारणांचे लाभार्थी, इंदिरा आवास योजनेतील लाभार्थी, कृषी कर्जमाफी व कर्ज सहाय्य योजनांतर्गत शेतकरी कुटुंबांचा समावेश आहे.
या सर्व प्रवर्गातील कुंटुंबांची रोहयो कामांसंदर्भांत मागणी नोंदविण्यासाठी सर्वेक्षण करण्यात येणार आहे. राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर ८ ते १४ ऑगस्ट या कालावधीत ग्राम रोजगार सेवकांमार्फत हे सर्वेक्षण करण्यात येणार आहे.
सर्वेक्षणात कुटुंबनिहाय कामांची मागणी रोजगार सेवकांकडून नोंदविली जाणार आहे. त्यामध्ये रोहयो अंतर्गत कुटुंबांचा जॉबकार्ड क्रमांक, कामाची मागणी, काम मागणीचे दिवस तसेच ज्यांची नोंदणी झाली नाही, अशा कुटुंबांना ह्यजॉब कार्डह्ण देण्याबाबतची माहिती नोंदविण्यात येणार आहे.
ही माहिती संबंधित ग्रामपंचायतींकडे सादर करण्यात येणार असून, त्यानुसार १५ ऑगस्ट रोजी होणार्या ग्रामसभांमध्ये ठराव घेतल्यानंतर ही माहिती पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्यात येणार आहे.लेबर बजेट त्याआधारेच तयार करण्यात येणार आहे.
** २५0 कुटुंबांचे सर्वेक्षण करणार एक रोजगार सेवक!
या सर्वेक्षणात एक ग्राम रोजगार सेवक २५0 कुटुंबांचे सर्वेक्षण करणार आहे. २५0 पेक्षा जास्त कुटुंबांची संख्या असल्यास, संबंधित ग्रामपंचायत स्तरावर कार्यरत महिला बचत गटांचे प्रतिनिधी, ग्रामसभेने मान्यता दिलेल्या विविध समित्यांचे पदाधिकारी व जास्त दिवस काम करणार्या मजूर कुटुंबातील शिक्षित मजुरांचीही या सर्वेक्षणाच्या कामासाठी मदत घेण्यात येणार आहे.
सर्वेक्षणात आधार क्रमांकही घेणार!
रोहयो अंतर्गत कुटुंबनिहाय रोजगार सेवकांमार्फत होणार्या या सर्वेक्षणात कामांची मागणी, जॉबकार्ड क्रमांक, कामांचे दिवस यासोबतच कुटुंबनिहाय आधार क्रमांकाची माहितीदेखील घेण्यात येणार आहे. कुटुंबातील सदस्यांची नावे आणि आधार क्रमांकाबाबतची माहिती या सर्वेक्षणात नोंदविण्यात येणार आहे.