कुटुंब रंगलय प्रचारात!
By Admin | Updated: October 13, 2014 01:11 IST2014-10-13T01:11:53+5:302014-10-13T01:11:53+5:30
पश्चिम नागपुरातील भाजपचे उमेदवार व प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्यावर राज्याची जबाबदारी असल्यामुळे त्यांना मध्येच प्रचार सोडून विविध सभांसाठी जावे लागते. पण त्यांच्या पत्नी अमृता

कुटुंब रंगलय प्रचारात!
लढण्याची ताकद आणि बळही देतात
दक्षिण - पश्चिम नागपुरातील भाजपचे उमेदवार व प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्यावर राज्याची जबाबदारी असल्यामुळे त्यांना मध्येच प्रचार सोडून विविध सभांसाठी जावे लागते. पण त्यांच्या पत्नी अमृता यांनी प्रचाराची धुरा पेलून धरली आहे. अमृता या सकाळपासूनच पदयात्रेत सहभागी होतात. सायंकाळी महिलांचे मेळावे घेतात व फडणवीस यांनी केलेल्या कामाचा लेखाजोखा मांडतात.
फडणवीस यांच्या मातोश्री सरिता यांना वाढत्या वयामुळे प्रचारात सहभागी होता येत नाही. मात्र, घरातही त्या सारख्या विचारपूस करीत असतात.ज्येष्ठ बंधू आशिष हे प्रचारातील समन्वयकाची भूमिका पार पाडत आहेत. याशिवाय नातेवाईक, आप्तेष्टही कामाला लागले आहेत.
पश्चिम नागपूरचे काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे यांच्या पत्नी वृंदा व मुलगा केतन आणि वृषभ सकाळपासूनच प्रचाराला लागतात. ठाकरे यांच्या घरी सकाळी ८ च्या सुमारास प्रमुख महिला कार्यकर्त्या जमतात. त्यांना सोबत घेऊन वृंदा आयोजित बैठकांसाठी घराबाहेर पडतात. दुपारपर्यंत बैठका आटोपून घरी परतात. दोन तासात जेवण व विसावा घेतला की पुन्हा बैठका व सायंकाळपासून पदयात्रांमध्ये सहभागी होतात.
मुले केतन व वृषभ दोघेही आपापल्या परीने प्रचाराची जबाबदारी पार पाडतात. जेथे वडील-आई पोहचू शकत नाही तेथे केतन पोहचून मतदारांना साकडे घालतो. याशिवाय जवळचे नातेवाईकही प्रचारात लागले आहे.
पश्चिम नागपूरमध्ये विद्यमान आमदार व भाजपचे उमेदवार सुधाकर देशमुख यांच्या प्रचारात पक्षाच्या कार्यकर्त्यांसोबत त्यांच्या पत्नी सुवर्णा, मुलगा सौरभ, भाऊ अभय, नात सून आणि नगरसेविका वर्षा ठाकरे, भाचा सतीश वडे सक्रिय भूमिका बजावत आहेत.
सुधाकरराव यांच्यासाठी मते मागतानाच त्यांच्या प्रकृतीची काळजी घेणे, त्यांना औषधाची आठवण करून देणे आदी जबाबदारी त्यांच्यावर आहे. सकाळी ७ वाजता पासून सुरू होणारा प्रचार कधी कुटुंबीयांसोबत तर कधी स्वतंत्रपणे केला जातो.
सुधाकरराव यांनी पाच वर्षात केलेल्या कामाचा लेखाजोखा मतदारांपुढे मांडतानाच उरलेली कामे पूर्ण करण्यासाठी पुन्हा कौल मागितला जातो.