सुमेध वाघमारे नागपूर : आयुर्वेदाने रोगाच्या मुळाशी जाऊन उपचार केल्यामुळे अनेक रुग्ण आता या उपचारपद्धतीकडे वळत आहेत. भारतातीलच नव्हे, तर पाश्चिमात्य देशांतीलही रुग्ण आयुर्वेदात आशा बाळगून भारतात येऊ लागले आहेत. नुकतेच जर्मनीमधील एकाच कुटुंबातील तीन रुग्ण नागपुरात आयुर्वेदाच्या उपचारासाठी आले. फ्रोझन शोल्डर, सांधेदुखी, पाठदुखी आणि सेरेब्रल पाल्सी यांसारख्या आजारांवर त्यांनी २१ दिवस उपचार घेतले. त्यांच्या आरोग्यात लक्षणीय सुधारणा झाल्याने ते समाधानाने परत गेले.
जर्मनीतील ६० वर्षीय गॅसर या महिलेला फ्रोझन शोल्डर आणि सांधेदुखीचा दीर्घकालीन त्रास होता. ३० वर्षांचा जान हा अनेक वर्षांपासून पोस्ट ट्रॉमॅटिक सेरेब्रल पाल्सीने ग्रस्त आहेत, तर ६९वर्षीय जामी या सततच्या पाठ दुखीमुळे त्रस्त होत्या. या तिघांवरही अॅलोपॅथी औषधोपचार सुरू असले तरी त्यातून केवळ तात्पुरता आराम मिळत होता, त्यामुळे हे रुग्ण समाधानी नव्हते. अखेर त्यांनी आयुर्वेदिक उपचार घेण्याचा निर्णय घेतला. इंटरनेटवर सखोल माहिती घेतल्यानंतर त्यांनी नागपूरच्या शंकरपूर येथील मेडआयु हॉस्पिटलमधील एकात्मिक आरोग्य केंद्रात उपचार घेण्याची निवड केली.
या केंद्रात त्यांच्यावर आयुर्वेदसोबतच होमिओपॅथी, फिजिओथेरपी, निसर्गोपचार आणि अॅलोपॅथीचा समन्वय साधून सर्वांगीण चिकित्सा करण्यात आली. २१ दिवसांच्या उपचारात त्यांच्यात मोठा बदल दिसून आला. त्यांचे वजन कमी झाले, वेदनांमध्ये लक्षणीय आराम मिळाला, आणि जुन्या वेदनांसारख्या विविध वैद्यकीय समस्यांवर मात करण्यास मदत झाली होती.
स्नायूंमध्ये अधिक लवचिकता आलीजान यांनी सांगितले, सेरेब्रल पाल्सीसोबत जगणे हे एक शारीरिक आणि मानसिक चॅलेंज आहे. यावर पंचकर्म आणि दररोजच्या योगामुळे स्नायूंमध्ये अधिक लवचिकता आली, शरीर अधिक सैलावल्याने दैनंदिन काम करणे अधिक सुलभ झाले. जामी या म्हणाल्या, आयुर्वेद आणि फिजिओथेरपीचा एकत्रित उपचाराने काही दिवसांतच दुखणे बरे झाले आणि मेटाबॉलिझम सुधारले.
समग्र उपचार पद्धतींवर जागतिक विश्वास हॉस्पिटलचे संचालक डॉ. धनराज गहुकर यांनी सांगितले, प्रतिबंधात्मक तसेच एकात्मिक उपचार पद्धतींसाठीची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. जर्मनीतील या तिन्ही रुग्णांवर पंचकर्म थेरपी, फिजिओथेरपी, निसर्गोपचार, दररोज योग व ध्यान, समुपदेशन आणि उपचारात्मक आहार अशा बहुआयामी उपचार करण्यात आले. भारतातील या समग्र उपचार पद्धतींवरील जागतिक विश्वास अधिक बळकट होत असल्याचे यावरून दिसून येते. या चिकित्सापद्धतीमुळे नागपूर मेडिकल हब होण्याची शक्यता आहे.