ठगबाजाचा जामीन फेटाळला
By Admin | Updated: December 14, 2015 03:20 IST2015-12-14T03:20:52+5:302015-12-14T03:20:52+5:30
मोठ्या प्रमाणावर बेरोजगार युवकांना नोकऱ्यांचे बनावट नियुक्तीपत्र देऊन लुबाडणूक करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीतील ..

ठगबाजाचा जामीन फेटाळला
नोकऱ्यांचे आंतरराज्यीय रॅकेट
नागपूर : मोठ्या प्रमाणावर बेरोजगार युवकांना नोकऱ्यांचे बनावट नियुक्तीपत्र देऊन लुबाडणूक करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीतील एका ठगबाजाचा जामीन अर्ज अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. टी. भालेराव यांच्या न्यायालयाने फेटाळून लावला.
अवनित उपेंद्रसिंग (२७), असे या ठगबाजाचे नाव असून तो उत्तर प्रदेशच्या गोरखपूर येथील रहिवासी आहे. त्याला २५ नोव्हेंबर २०१५ रोजी अटक करण्यात आली होती. तो या संघटित टोळीत सावज हेरण्याचे आणि वसुली करण्याचे काम करायचा.
ओडिशाच्या राऊरकेला येथील चैताली तपन मुखर्जी (२९) नावाची तरुणी या टोळीची सूत्रधार आहे. या टोळीत आणखी एक २२ वर्षांची तरुणी असून तिचे नाव आयुषी श्रीवास्तव असे आहे. भानुप्रतापसिंग (२६) रा. गोरखपूर आणि अरुण सातपुते हेही या टोळीतील सक्रिय सदस्य आहेत. हे आरोपी अद्यापही गवसले नाहीत. झिंगाबाई टाकळी येथील रहिवासी आशिष यशवंत डोंगरे (३४) यांच्या तक्रारीवरून या टोळीविरुद्ध गिट्टीखदान पोलिसांनी १८ मार्च २०१४ रोजी गुन्हा दाखल केला होता.
अवनितसिंग याने आशिष डोंगरे यांचा मावस भाऊ चेतन पुरुषोत्तम रंगारी (३०) रा. न्यू ठवरे कॉलनी कामठी रोड याला हेरून चैताली मुखर्जी ही भुवनेश्वर येथील इंडियन आॅईल कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम, ओडिशा सचिवालय, टाटा प्रोजेक्ट, वेस्टर्न कोल फिल्ड आदी वेगवेगळ्या ठिकाणी नोकरी लावून देते, असे सांगितले होते. आशिषने अवनितसिंग याला आपला साळा अश्विन चिंतामण बोरकर हा मेकॅनिकल इंजिनियर असून बेरोजगार असल्याचे सांगितले होते. यावर अवनितसिंगने अश्विनला इंडियन आॅईलमध्ये नोकरी लावून देता येईल असे सांगितले होते. त्याला ४५ हजार रुपये पगार मिळेल, भुवनेश्वर किंवा पॅराद्वीप येथे नेमणूक होईल, राहण्याची सोय राहील, एकूण खर्च ४ लाख रुपये खर्च येईल, असे सांगितले होते. सौदेबाजी होऊन ३ लाख ५० हजार रुपये देण्याचे ठरले होते.
६ आॅक्टोबर २०१३ रोजी आशिष डोंगरे यांनी अश्विनच्या नोकरीसाठी अवनितसिंगला आधी १ लाख ५० हजार रुपये दिले होते. अवनितसिंग याने अश्विनला भुवनेश्वर येथे बोलावून घेऊन चैतालीसोबत भेट घालून दिली होती.
चैतालीने एका हॉटेलमध्ये अश्विनला अरुण सतपते नावाच्या इसमासोबत भेट घालून दिली होती. त्याने अश्विनची मौखिक मुलाखत घेतली होती. नोकरीचे आॅफर लेटर निघत असल्याचे सांगून त्याच्याजवळून पुन्हा २ लाख रुपये घेतले होते.
आरोपी अवनितसिंगला या टोळीतील सर्वांची ठिकाणे माहीत असल्याने न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळून लावला. न्यायालयात सरकारच्यावतीने अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील नितीन तेलगोटे यांनी काम पाहिले. सहायक पोलीस निरीक्षक एल. एस. तसरे हे या प्रकरणाचे तपास अधिकारी आहेत. (प्रतिनिधी)