मंचलवार दाम्पत्याविरुद्ध दोषारोपपत्र
By Admin | Updated: May 23, 2015 02:53 IST2015-05-23T02:53:57+5:302015-05-23T02:53:57+5:30
हजारो ठेवीदारांची कोट्यवधी रुपयांनी फसवणूक करणाऱ्या ठगबाज हरिभाऊ मंचलवार आणि त्याची पत्नी मीना या दोघांविरुद्ध गुन्हेशाखेने कोर्टात २९०५ पानांचे दोषारोपपत्र दाखल केले.

मंचलवार दाम्पत्याविरुद्ध दोषारोपपत्र
कोट्यवधीची संपत्ती जप्त : गुन्हेशाखेची कारवाई
नागपूर : हजारो ठेवीदारांची कोट्यवधी रुपयांनी फसवणूक करणाऱ्या ठगबाज हरिभाऊ मंचलवार आणि त्याची पत्नी मीना या दोघांविरुद्ध गुन्हेशाखेने कोर्टात २९०५ पानांचे दोषारोपपत्र दाखल केले.
झेंडा चौक, महाल, येथे राहणारा हरिभाऊ मंचलवार सावकारी करीत होता. सोने गहाणाचा आणि नवग्रहाचे खडे विक्रीचाही तो व्यवसाय करीत होता. संपर्कात आलेल्या व्यक्तीला तो महिन्याला २ टक्के व्याज देण्याचे आमिष दाखवून मोठ्या रकमेच्या ठेवी गोळा करीत होता. गोडबोल्या स्वभावाच्या मंचलवारच्या आमिषाला बळी पडून हजारो ठेवीदारांनी त्याच्याकडे कोट्यवधी रुपये ठेवले. २०११ मध्ये तो अचानक बेपत्ता झाला. त्यानंतर त्याच्याकडे ठेवी ठेवणाऱ्या हवालदिल गुंतवणूकदारांनी पोलिसांकडे धाव घेतली. ३ जून २०११ ला हरिभाऊ आणि त्याची पत्नी मीना या दोघांविरुद्ध कोतवाली पोलिसांनी फसवणूकीचा गुन्हा दाखल केला. हे प्रकरण नंतर गुन्हेशाखेकडे सोपविण्यात आले.
कोट्यवधींची संपत्ती जप्त
गुन्हेशाखेत केवळ ४१७ ठेवीदारांनी तक्रारी दिल्या. त्यावरून १७ कोटी ९८, लाख, ५३ हजारांची रक्कम मंचलवार दाम्पत्याने हडपल्याचा आरोप ठेवून गुन्हेशाखेच्या पोलिसांनी त्याच्याकडून दीड लाखाची रोकड, १२ लाख, ५८ हजारांचे दागिने, दोन मारुती कार जप्त केल्या. विविध बँकांमध्ये असलेली त्याचे ३३ खाती होती. त्यात ८९ लाख, ८७ हजार रुपये आणि पोस्टात २ लाख, ७३ हजार रुपये गुंतवणूक आढळली. पोलिसांही सर्व खाती तसेच २७ विमा पॉलिसीही गोठवल्या. त्याच्या एकूण ११ स्थावर मालमत्ताही सील करण्यात आल्या. गुन्हेशाखेचे अतिरिक्त आयुक्त श्रीकांत तरवडे, उपायुक्त दीपाली मासिरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक उमेश मछिंदर यांनी तपास करून हरिभाऊ तसेच मीना मंचलवार विरुद्ध कोर्टात दोषारोपपत्र दाखल केले. (प्रतिनिधी)