नागपुरात तोतया पोलिसांचा हैदोस : दीड तासात चार वृद्धांना लुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2018 07:22 PM2018-12-06T19:22:08+5:302018-12-06T19:32:05+5:30

तोतया पोलिसांनी शहरात हैदोस घातला असून, बुधवारी अवघ्या दीड तासात त्यांनी चार वृद्धांचे रोख आणि दागिने लुटून नेले. प्रतापनगर, बेलतरोडी आणि अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी सकाळी ११ ते १२.३० या वेळेत या घटना घडल्या. यामुळे ज्येष्ठ नागरिकात दहशत निर्माण झाली आहे.

Fake police raging in Nagpur: Four elderly people have been robbed in one and a half hours | नागपुरात तोतया पोलिसांचा हैदोस : दीड तासात चार वृद्धांना लुटले

नागपुरात तोतया पोलिसांचा हैदोस : दीड तासात चार वृद्धांना लुटले

Next
ठळक मुद्देअडीच ते तीन लाखांचे दागिने लंपास

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : तोतया पोलिसांनी शहरात हैदोस घातला असून, बुधवारी अवघ्या दीड तासात त्यांनी चार वृद्धांचे रोख आणि दागिने लुटून नेले. प्रतापनगर, बेलतरोडी आणि अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी सकाळी ११ ते १२.३० या वेळेत या घटना घडल्या. यामुळे ज्येष्ठ नागरिकात दहशत निर्माण झाली आहे.
११ वाजता जयताळा
मधुकर ओमकार काळे (वय ६७, रा. सीता गार्डन लॉनजवळ, जयताळा) हे बुधवारी सकाळी ११ वाजता पंजाब नॅशनल बँकेच्या खामला शाखेतून रक्कम काढून घराकडे पायी जात होते. अग्ने ले-आऊटमध्ये एका कुरियरच्या कार्यालयाजवळ ३५ ते ४० वयोगटातील दोन आरोपींनी त्यांना रोखले. आम्ही पोलीस आहोत. येथे चेकिंग सुरू आहे, असे म्हणून त्यांनी काळे यांना त्यांच्याकडची सोन्याची अंगठी, सोनसाखळी तसेच सात हजार रुपये तपासणीच्या नावाखाली ताब्यात घेतले. त्यानंतर आरोपी पळून गेले. काळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून प्रतापनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
११.३० बेलतरोडी
गिरधर महादेवराव पराते (वय ६१, रा. बेलतरोडी) हे बुधवारी सकाळी ११.३० वाजता सप्तगिरीनगरकडे दर्शनाकरिता जात होते. त्यांना तीन आरोपींनी अडवले. स्वत: पोलीस असल्याची बतावणी करून लुटमार होत असल्याची भीती दाखवली. पराते यांना सोन्याची साखळी, अंगठी खिशातून काढून रुमालात बांधून ठेवण्यास सांगितले. हा रुमाल आणि दागिने स्वत:च्या हातात घेऊन ती बांधल्याचा देखावा करत आरोपींनी सोनसाखळी आणि अंगठी लंपास केली. खाली रुमालाची गाठ बांधून पराते यांना दिल्यानंतर आरोपी पळून गेले. पराते यांनी दिलेल्या तक्रारीवरून बेलतरोडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
११.४५ मनीषनगर
श्यामनगरातील अमृत लॉनमागे राहणारे संजय दत्तात्रय गुंडावार (वय ६५) हे त्यांच्या नातवाला शाळेत आणायला गेले होते. वेळ असल्याने ते एका गॅरेजच्या बाजूला चहा पिण्यासाठी थांबले. तेवढ्यात तेथे तीन आरोपी आले. आम्ही पोलीस आहोत. इकडे लुटमारीच्या घटना घडत आहेत. तुम्ही सोन्याचे दागिने घालून कशाला जाता, असे विचारत त्यांनी गुंडावार यांना सोन्याच्या अंगठ्या, मोबाईल, पैसे आणि अ‍ॅक्टिव्हाची चावी दाखवायला सांगितली. त्यानंतर खिशातून रुमाला काढायला सांगितला. त्यात सोन्याच्या अंगठ्या बांधल्याचा देखावा केला.
रुमाल, मोबाईल, पैसे आणि दुचाकीची चावी गुंडावार यांना परत करून आरोपी निघून गेले. काही वेळानंतर गुंडावार यांनी रुमालाची गाठ सोडून बघितली असता त्यात दागिने नव्हते. गुंडावार यांनी दिलेल्या तक्रारीवरून बेलतरोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
१२.३० नालंदानगर, अजनी
चौथी अशीच घटना अजनीतील नालंदानगरात घडली. पुरुषोत्तम डोमाजी मून (वय ६८) हे त्यांच्या दुचाकीने बुधवारी दुपारी १२.३० वाजता मित्राच्या घरून स्वत:च्या घरी जायला निघाले. आंबेडकरनगर टी पॉर्इंटकडून दुचाकीवर आलेल्या दोन आरोपींनी त्यांना रोखले. आम्ही पोलीस आहोत, असे सांगून इकडे गांजाची खेप येणार असल्याची टीप आम्हाला मिळाली, असे म्हणत त्यांनी समोरून आलेल्या एका व्यक्तीला थांबवले. त्याची बॅग तपासल्याचे नाटक करून नंतर मून यांची तपासणी केली. त्यांना त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी आणि अंगठी रुमालात बांधून ठेवण्यास सांगत हे दोन्ही दागिने बेमालूमपणे लंपास केले. रुमालाची गाठ बांधून ती मून यांच्या हातात दिल्यानंतर आरोपी पळून गेले. मून यांनी काही वेळेनंतर रुमालाची गाठ सोडून बघितली तेव्हा त्यात सोनसाखळी आणि अंगठी दिसली नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने मून यांनी अजनी ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
बनावट ओळखपत्राचाही वापर
अवघ्या दीड तासात चार गुन्हे करणारे आरोपी हे सराईत गुन्हेगार असल्याचे स्पष्ट झाले. धिटाई दाखवणाऱ्या व्यक्तीला कसे दडपणात आणायचे, याचे तंत्र त्यांना माहीत आहे. म्हणूनच ते जवळ बनावट ओळखपत्रही ठेवत होते. अजनीतील गुन्हा करताना त्यांनी स्वत:ला सीआयडी पोलीस असल्याचे मून यांना सांगितले. एवढेच नव्हे तर तसे ओळखपत्रही (बनावट) त्यांना दाखवले. अशा प्रकारचे गुन्हे करणारी टोळी सहा महिन्यांपूर्वी सीताबर्डी पोलिसांनी ताब्यात घेतली होती. तर, गुन्हे शाखेचे पथक अशा प्रकारे गुन्हे करणारांच्या शोधात अहमदनगर जिल्ह्यातही जाऊन आले होते. मात्र, पोलिसांना अशा अनेक गुन्ह्यांचा छडा लावण्यात यश आलेले नाही.

 

 

Web Title: Fake police raging in Nagpur: Four elderly people have been robbed in one and a half hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.