योगेश पांडे - नागपूरलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आपण जेवणात वापरत असलेले खाद्यतेल ब्रॅंडेड वाटत असले तरी ते बनावट असण्याची शक्यता आहे. नागपुरात ब्रॅंडेडच्या नावाखाली बनावट खाद्यतेल विकणाऱ्या एका रॅकेटचा भंडाफोड झाला आहे. लकडगंजमधील एका व्यापाऱ्याकडे धाड टाकत पोलिसांनी त्याची पोलखोल केली आहे. मागील दीर्घ कालावधीपासून व्यापारी हा गोरखधंदा करत होता. गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक चारच्या पथकाने ही कारवाई केली.
वासुदेव तुलाराम खंडवानी (६५, रामदेव अपार्टमेंट, लकडगंज) असे आरोपीचे नाव आहे. त्याचे वॉर्ड क्रमांक ३८ येथील मोखारे मोहल्ला येथे गोदाम असल्याची पोलिसांना माहिती मिळाली. पोलिसांनी मंगळवारी सायंकाळी तेथे धाड टाकली. त्यावेळी तेथे किंग्स सोयाबीन ऑईल, फाॅर्चुन सनलाईट रिफाइंड सोयाबीन ऑईल, फाॅर्चुन सोया हेल्थ रिफाइंड सोयाबीन ऑईल या कंपन्यांचे बनावट लोगो, स्टीकर वापरून साठा केलेला आढळून आला. बनावट तेल या कंपन्यांचे स्टीकर्स लावून खंडवानी विकत होता. पोलिसांनी तेथून वेगवेगळया कंपन्यांचे लेबल असलेल्या बनावट सोयाबीन ऑईलचे ४६ डब्बे, पॅकिंग मशीन, रिकामे तेलाचे ड्रम, इलेक्ट्रीक वजन काटा असा १.१८ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपीविरोधात कॉपीराईट ॲक्टअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला लकडगंज पोलीस ठाण्याच्या हवाली करण्यात आले.
अनेक ठिकाणी बनावट तेलशहरात अनेक ठिकाणी ब्रॅंडेडच्या नावाखाली बनावट तेलाची विक्री करण्यात येत आहे. ग्राहकांकडून तेलाचे रिकामे डब्बे भंगारवाल्यांच्या माध्यमातून खरेदी केले जातात. त्या डब्यांत बनावट तेल टाकून त्यावर मोठ्या ब्रॅंडचे बनावट स्टीकर व लोगो लावले जाते. त्यानंतर त्याची बाजारात सर्रास विक्री होते. काही व्यापारी तर या डब्यांना अगदी खऱ्या डब्याप्रमाणे सीलदेखील लावत आहेत. पोलिसांकडून हवी तशी कारवाई होत नसल्याने व्यापाऱ्यांची हिंमत वाढली आहे व ते जनतेच्या जीवाशी खेळ करत आहेत.