तोतया एसीपीने केली शासकीय वेबसाईट हॅक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 12:39 AM2021-06-26T00:39:33+5:302021-06-26T00:40:23+5:30

Fake ACP hacked website एसीपी किंवा एफडीएचे असिस्टंट कमिश्नर म्हणून आवाज बदलवून खाद्य सामुग्री व औषध विक्रेत्यांना ठगवणारा राहुल सराटे शासकीय संकेतस्थळे (वेबसाईट) हॅक करून सूचना प्राप्त करत होता. शासकीय संकेतस्थळावरून मिळालेल्या माहितीच्या आधारावरच तो गेल्या दोन वर्षापासून ठगबाजी करत होता. बजाजनगर पोलिसांच्या तपासात या प्रकरणाचा खुलासा झाला आहे.

Fake ACP hacked government website | तोतया एसीपीने केली शासकीय वेबसाईट हॅक

तोतया एसीपीने केली शासकीय वेबसाईट हॅक

googlenewsNext
ठळक मुद्देआवाज बदलण्यासाठी ॲपचा उपयोग : बजाजनगर पोलिसांनी केलेल्या तपासात झाला खुलासा

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : एसीपी किंवा एफडीएचे असिस्टंट कमिश्नर म्हणून आवाज बदलवून खाद्य सामुग्री व औषध विक्रेत्यांना ठगवणारा राहुल सराटे शासकीय संकेतस्थळे (वेबसाईट) हॅक करून सूचना प्राप्त करत होता. शासकीय संकेतस्थळावरून मिळालेल्या माहितीच्या आधारावरच तो गेल्या दोन वर्षापासून ठगबाजी करत होता. बजाजनगर पोलिसांच्या तपासात या प्रकरणाचा खुलासा झाला आहे.

मुंबई येथील कुलाबा पोलिसांनी २७ वर्षीय राहुल सराटे याला औषध विक्रेत्याला फसविण्याच्या प्रकरणात अटक केली आहे. राहुलने २९ मे रोजी देवनगर स्थित औषध विक्रेते शशांक अग्रवाल यांना आपल्या जाळ्यात अडकवले. या प्रकरणात बजाजनगर पोलीसही भ्रमित झाले होते. दरम्यान कुलाबा पोलिसांनी राहुलला अटक केली आहे. त्यानंतर बजाजनगर पोलिसांनी त्याला आपल्या ताब्यात घेतले. राहुलचे वडील बीएमसीमध्ये स्वच्छता कर्मचारी आहेत. त्याची पत्नी व चिकित्सक बहीण यांच्याशी राहुलने संबंध तोडले आहेत. बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर त्याने मर्चेट नेव्हीचे प्रशिक्षण घेतले. २०१५ मध्ये तो दुबईला गेला. तेथे वेल्डरचे काम करत होता. २०१८ मध्ये येथे आल्यानंतर त्याने फसवणूक आणि वसुलीचे काम सुरू केले. त्याच्या विरोधात मुंबई-ठाणेसह अनेक ठिकाणी गुन्ह्यांची नोंद आहे. त्यामुळेच, तो विदेशात जाऊ शकत नव्हता. बेरोजगार असल्याने त्याने ठगबाजीस सुरुवात केली. शाळेत असताना पासूनच तो वेबसाईट हॅक करायला लागला. औषध, बेकरी व खाद्य सामुग्री विक्रेत्यांच्या विरोधात नेहमी तक्रारी येत असल्याची त्याला माहिती होती. शिवाय, संबंधित विभागाकडून कारवाई करण्याऐवजी तक्रारींना लेन-देन करून निरस्त करण्यात येत असल्याचेही त्याला ठाऊक होते. अशा लोकांना सहजगत्या जाळ्यात ओढणे सोपे होते. त्या अनुषंगाने राहुल एफडीए किंवा एफएसएसआयच्या अधिकृत संकेतस्थळाला हॅक करून, त्यात नोंदलेल्या तक्रारींचे स्वरूप, व्यापाऱ्यांचे नाव, पत्ता व मोबाईल नंबर मिळवून घेत होता. त्यानंतर संबंधित व्यापाऱ्याला फोन करून धमकावत होता. मोबाईलमध्ये व्हाईस चेजिंग ॲपचा वापर करून तो एसीपी, एफडीएचा असिस्टंट कमिश्नर, ग्राहक न्यायालयातील अधिकारी म्हणून वेगवेगळ्या आवाजाने संपर्क साधत होता. व्यापाऱ्यांना वेगवेगळ्या नंबरवरून फोन करून गुन्हा दाखल करण्याचा किंवा दुकान सिल करण्याची धमकी देत होता. यापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी कथित तक्रारदाराच्या अकाऊंटमध्ये दंडाची राशी ऑनलाईन जमा करण्यास संबंधिताला वेठीस धरत होता. व्यापारी राहुलचे गोष्टींना खरे समजून रक्कम ट्रान्सफर करत होते. शशांककडूनही हीच चूक झाली. परंतु, नंतर एफडीएचा दंड ग्राहक बँक अकाऊंटमध्ये जमा करण्याची चूक लक्षात आल्यावर शशांक पोलीस ठाण्यात पोहोचले. राहुलच्या विरोधात आतापर्यंत ८ प्रकरणांची नोंद आहे. त्याने अनेक व्यापाऱ्यांना आपल्या फास्यात ओढले आहे. परंतु, बदनामीच्या भीतीपोटी ते पुढे येत नसल्याचे स्पष्ट होत आहे. ही कारवाई डीसीपी नुरुल हसन यांच्या मार्गदर्शनात शुभांगी देशमुख, एएसआय संजय ठाकूर, शिपाई सतीश ठाकूर, सुभाष गजभिये व नितेश वाकडे यांनी केली.

प्राचार्यांचा कॉम्प्युटर केला होता हॅक

नवव्या वर्गात असताना राहुलने शाळेतील प्राचार्यांचा कॉम्प्युटर हॅक करून चाचणी पेपर मिळवला होता. पहिल्याच प्रयत्नात त्याचा हा प्रयत्न यशस्वी झाल्याने त्याचा आत्मविश्वास बळावला होता. त्यानंतर त्याने मागे वळून पाहिले नाही. बारावी उत्तीर्ण असलेल्या राहुलची तल्लख बुद्धी पाहुन पोलीस अवाक आहेत.

Web Title: Fake ACP hacked government website

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.