फडणवीस-गडकरींच्या सिटीला ‘स्मार्ट’ झटका
By Admin | Updated: January 29, 2016 05:16 IST2016-01-29T05:16:30+5:302016-01-29T05:16:30+5:30
केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी स्मार्ट सिटी योजनेतील २० शहरांच्या पहिल्या यादीत नागपूर शहराचा समावेश राहील अशी

फडणवीस-गडकरींच्या सिटीला ‘स्मार्ट’ झटका
नागपूर : केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी स्मार्ट सिटी योजनेतील २० शहरांच्या पहिल्या यादीत नागपूर शहराचा समावेश राहील अशी खात्री होती. भाजपने यासाठी कॅम्पेन चालविले होते. विरोधी पक्षांनीही राजकीय मतभेद बाजूला सारून या योजनेत आपल्या शहराचा समावेश व्हावा म्हणून सहकार्याची भूमिका घेतली होती. परंतु स्मार्ट सिटीच्या स्पर्धेत कमी पडल्याने पहिल्या यादीतून नागपूरला वगळण्यात आले आहे. यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या सिटीला ‘स्मार्ट ’धक्का बसला आहे.
केंद्रीय नगरविकास मंत्री वेंकय्या नायडू यांनी गुरुवारी स्मार्ट सिटी योजनेसाठी निवड झालेल्या पहिल्या टप्प्यातील २० शहरांची घोषणा केली. या योजनेसाठी देशभरातील ९७ शहरांनी नावे दिली होती. निवडीसाठी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. परंतु महापालिका प्रशासन मोबाईल अॅप, संकेत स्थळावर प्रतिक्रिया, आॅनलाईन कामकाज यात कमी पडले. तसेच सादरीकरणात त्रुटी राहिल्याने नागपूर शहराला पहिल्या यादीतून वगळण्यात आल्याची माहिती आहे.
फडणवीस व गडकरी यांचे शहर असल्याने नागपूरचा स्मार्ट सिटी योजनेत समावेश होईल, असा ठाम विश्वास शहरातील जनतेला होता. यासाठी पदाधिकाऱ्यांसोबतच प्रशासकीय यंत्रणा या कामाला लागली होती. नगरसेवकांनी प्रचार चालविला होता. बैठका, चर्चासत्र यांचे आयोजन करण्यात आले होते. शहराच्या उभारणीत नागरिकांचाही सहभाग असावा म्हणून त्यांच्या सूचना व कल्पना मागविण्यात आल्या होत्या. प्रतिक्रियासाठी ५ लाख ५० हजार अर्ज वाटप केले होते. यातील ३ लाख ५ हजार नागरिकांनी सूचना केल्या होत्या. ५१२० नागरिकांनी आॅनलाईन अर्ज भरले. स्मार्ट सिटीत निवड व्हावी यासाठी महापालिका व डिव्हिलिंग चेंज फाऊंडेशन(डीसीएफ) ने नागरिकांचा सहभाग अभियान राबविले होते. तसेच शहराच्या विविध भागात रोड शोच्या माध्यमातून नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यात आल्या.
विकास आराखड्यावरून स्मार्ट सिटीसाठी निवड होणार असल्याने यात कमी पडू नये यासाठी महापालिका प्रशासनाने ही जबाबदारी क्रिसिल या संस्थेकडे सोपविली होती. यावर ८० लाख खर्च करण्यात आले. केंद्र सरकारने सुचविलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार स्मार्ट सिटी योजनेच्या अंमलबाजवणीसाठी‘स्पेशल परपज व्हेईकल’(एसपीव्ही)कंपनीची स्थापना करण्यात आली. एरियाबेस डेव्हलपमेंट आराखड्यात पहिल्या टप्प्यात भरतवाडा व पारडी, दुसऱ्या टप्प्यात नारा, नारी व वांजरा तर तिसऱ्या टप्प्यात मानेवाडा व बाभुळखेडा यांचा समावेश करण्यात आला होता.
पॅनसिटी अंतर्गत शहरातील स्वच्छतेवर लक्ष केंद्रित करण्यात येणार होते. शहराची स्वच्छता, चांगले रस्ते, सर्व भागाला पाणीपुरवठा, आरोग्य व शिक्षणाच्या चांगल्या सुविधा उपलब्ध कराव्यात, अशा सूचना बहुसंख्य लोकांनी केल्या होत्या. मूलभूत सुविधांसोबतच लोकांनी मेट्रो रेल्वे, वायफाय, प्रदूषणमुक्त शहर, सांडपाण्याची विल्हेवाट, चांगली उद्याने, खेळाची मैदाने व ग्रीन सिटीसाठी वृक्षारोपण करण्याची सूचना केली होती. यातील चांगल्या सूचनांचा समावेश करून अहवाल केंद्र सरकारला सादर करण्यात आला होता. स्मार्ट सिटीसाठी निवड व्हावी, यासाठी महापालिकेतील पदाधिकारी, नगरसेवक, विरोधी पक्ष तसेच प्रशासनाने प्रयत्न केले होते. परंतु केंद्र सरकारने सुचविलेल्या मार्गदर्शक तत्त्वाला पात्र न ठरल्याने व सादरीकरणात कमी पडल्याने शहरातील नागरिकांचा अपेक्षाभंग झाला आहे.(प्रतिनिधी)
वर्षभर करावी लागेल प्रतीक्षा
देशभरातील १०० शहरांची स्मार्ट सिटीसाठी निवड केली जाणार आहे. यातील पहिल्या टप्प्यात २० शहरांची घोषणा करण्यात आली. दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यात प्रत्येकी ४० शहरांची निवड केली जाणार आहे. दुसऱ्या टप्प्यातील शहरांची घोषणा पुढील वर्षात होणार असल्याने निवडीसाठी शहरातील नागरिकांना वर्षभर प्रतीक्षा करावी लागणार आहे.
जोमाने प्रयत्न करू
स्मार्ट सिटीच्या पहिल्या यादीत समावेश झालेल्या २० शहरांचे आम्ही स्वागत करतो. नागपूरची निवड झालेली नाही याचा खेद आहे. परंतु निराश झालेलो नाही. स्मार्ट सिटीत निवड व्हावी यासाठी महापालिकेतील सहयोगी पक्ष, विरोधी पक्ष तसेच प्रसार माध्यमांनी सहकार्य केले. आयुक्त व त्यांच्या सहकाऱ्यांनी यासाठी प्रयत्न केले. परंतु निवड झाली नाही. आता दुसऱ्या टप्प्यात या योजनेसाठी निवड व्हावी म्हणून नव्या जोमाने प्रयत्न करू. यात शहरातील नागरिकांचे सहकार्य मिळेल. प्रशासनाने पुन्हा जोमाने प्रयत्न करावे. आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत.
- प्रवीण दटके, महापौर
समावेशाचा आनंद झाला असता
स्मार्ट सिटी योजनेत आपल्या शहराचा समावेश व्हावा, अशी शहरातील जनतेची इच्छा होती. यासाठी आम्ही सहकार्याची भूमिका घेतली. महापौर, प्रशासनाने यासाठी प्रयत्न केले. परंतु स्पर्धेत अपेक्षित यश मिळाले नाही. निराश न होता यात शहरातील जनतेने अधिकाअधिक सहभाग घ्यावा. पुढील टप्प्यात आपल्याही शहराची या योजनेसाठी निवड होईल, अशी अपेक्षा आहे.
- विकास ठाकरे, विरोधी पक्षनेते, महापालिका
कमी पडल्याचा शोध घेऊ
स्मार्ट सिटी योजनेसाठी ज्या शहरांची निवड झाली, त्यांचे अभिनंदन. स्मार्ट सिटीसाठी निवड होण्याकरिता स्पर्धा होती. आपल्यापेक्षा इतरांनी काही बाबतीत अधिक चांगले प्रदर्शन केले असावे. आपण कुठे कमी पडलो, याचा शोध घेऊ न या त्रुटींची पूर्तता करू. मोबाईल अॅप, संकेतस्थळांवर प्रतिक्रिया नोंदविण्यात कमी पडलो का याचाही शोध घेऊ न डिपीआरमध्ये सुधारणा करून तो केंद्र सरकारकडे पाठविला जाईल.
- श्रावण हर्डीकर, आयुक्त महापालिका
पुढील प्रयत्नात यशस्वी होऊ
स्मार्ट सिटीसाठी नागपूर शहराची निवड होईल, अशी अपेक्षा होती. यासाठी महापौर प्रवीण दटके, पदाधिकारी, विरोधी पक्ष तसेच प्रशासनाने प्रयत्न केले. परंतु स्पर्धेत कमी पडलो. परंतु यामुळे निराश न होता, पुन्हा अधिक जोमाने प्रयत्न करून यात यशस्वी होऊ . यात जनतेनेसुद्धा अधिकाअधिक सहभाग घ्यावा असे आवाहन करतो.
- आ. सुधाकर कोहळे, भाजप शहर अध्यक्ष