विनाअनुदानित महाविद्यालयांच्या अडचणीत
By Admin | Updated: May 27, 2014 01:48 IST2014-05-27T01:48:17+5:302014-05-27T01:48:17+5:30
केवळ महाविद्यालयाच्या नावाचा फलक लावून दुकानदारी करणार्या महाविद्यालयांच्या मुसक्या आवळण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. ज्या महाविद्यालयांमध्ये पूर्णवेळ प्राध्यापक वर्ग नाही

विनाअनुदानित महाविद्यालयांच्या अडचणीत
वाढ प्रवेश थांबविणार : पूर्णवेळ प्राध्यापक भरण्याचे सक्त निर्देश
दिगांबर जवादे -गडचिरोली
केवळ महाविद्यालयाच्या नावाचा फलक लावून दुकानदारी करणार्या महाविद्यालयांच्या मुसक्या आवळण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. ज्या महाविद्यालयांमध्ये पूर्णवेळ प्राध्यापक वर्ग नाही, विद्यार्थ्यांना आवश्यक भौतिक सोयी-सुविधा नाही, अशा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे नामांकन (एन्रॉलमेंट) करणे थांबविणार आहे. त्यामुळे विनाअनुदानित महाविद्यालयांच्या अडचणी वाढणार आहेत. शासनाने खर्चात कपात करण्यासाठी विनाअनुदानित महाविद्यालये व विद्यालये देण्याचे धोरण सुरू केले. आज ना उद्या अनुदान मिळेल, या आशेवर संस्थाप्रमुखांनी परवानगी आणून महाविद्यालये सुरू केली. परवानगी घेते वेळी स्वत:च्या बळावर महाविद्यालय चालवू, विद्यार्थ्यांना आवश्यक असलेल्या भौतिक सोयी-सुविधा पुरवू, शासनाकडून कधीही अनुदानाची अपेक्षा करणार नाही, असे सुद्धा शासनाकडे लिहून दिले आहे. मात्र प्रत्यक्ष परिस्थिती वेगळीच असल्याचे दिसून येते. बर्याचशा विनाअनुदानित महाविद्यालयांमध्ये पूर्णवेळ प्राध्यापक नाही. काही महाविद्यालयांनी तर प्राध्यापकच नेमले नाहीत, एवढेच नाही तर प्रात्यक्षिक अभ्यासक्रमासाठीही प्राध्यापक नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक कोण शिकविणार व त्याचे गुण कोण देणार, असा प्रश्न मागील वर्षी गोंडवाना विद्यापीठासह अनेक विद्यापीठांमध्ये उपस्थित केल्या गेला. शिक्षणाचा गंधही नसलेल्या महाविद्यालयाच्या संस्थाप्रमुखांनी प्रात्यक्षिकाचे गुण दिल्याचेही समोर आले होते. यामुळे शिक्षणाचा दर्जा घसरत चालला असल्याचे शासनाच्या लक्षात आल्यानंतर अशा महाविद्यालयांच्या मुसक्या आवळण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत या महाविद्यालयांवर कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश प्रधान सचिवांनी दिले आहेत. सत्र सुरू होण्यापूर्वी महाविद्यालयांनी पूर्णवेळ प्राध्यापक, प्राचार्य न भरल्यास त्याचबरोबर विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निकषानुसार आवश्यक असलेल्या भौतिक सोयी-सुविधा न पुरविल्यास या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे नामांकन बनवून देणे थांबविले जाणार आहे. त्यामुळे महाविद्यालय आपोआप अडचणीत येणार आहेत. पूर्णवेळ प्राध्यापक व आवश्यक भौतिक सोयी-सुविधा नसलेली राज्यभरात हजारो महाविद्यालये आहेत. शासनाच्या या निर्णयामुळे महाविद्यालयांच्या संस्थाप्रमुखांचे धाबे दणाणले आहे. काही महाविद्यालयांनी तर या बाबीचा धसका घेत पूर्ण वेळ प्राध्यापक व प्राचार्य भरण्याची तयारी सुरू केली आहे.