परीक्षेच्या तोंडावर प्रभारी परीक्षा नियंत्रकांचे ‘हात’ वर

By Admin | Updated: March 11, 2015 02:05 IST2015-03-11T02:05:19+5:302015-03-11T02:05:19+5:30

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्रभारी परीक्षा नियंत्रक प्रशांत मोहिते यांनी अतिरिक्त पदाचा कार्यभार काढण्यात यावा, अशी विनंती प्रभारी कुलगुरूंना केली आहे.

In the face of the examination, the in-charge of the Controller of Examinations is on hand | परीक्षेच्या तोंडावर प्रभारी परीक्षा नियंत्रकांचे ‘हात’ वर

परीक्षेच्या तोंडावर प्रभारी परीक्षा नियंत्रकांचे ‘हात’ वर

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्रभारी परीक्षा नियंत्रक प्रशांत मोहिते यांनी अतिरिक्त पदाचा कार्यभार काढण्यात यावा, अशी विनंती प्रभारी कुलगुरूंना केली आहे. यामुळे उन्हाळी परीक्षांच्या तोंडावर परीक्षा विभाग संकटात सापडला आहे. सध्या विद्यापीठ ‘प्रभारी’ भरोसे असताना व हिवाळी परीक्षेत चांगली कामगिरी केल्यानंतर मोहिते यांनी कामाच्या भाराचे कारण दाखवत अचानक असा निर्णय घेतल्याबद्दल विद्यापीठ वर्तुळात आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. विशेष म्हणजे मोहिते हेच या पदासाठी सुरुवातीला इच्छुक होते.
पूर्णवेळ परीक्षा नियंत्रक विलास रामटेके यांनी राजीनामा दिल्यानंतर ‘बीसीयूडी’ संचालक डॉ. श्रीकांत कोमावार यांच्याकडे परीक्षा विभागाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. परंतु त्यांच्या कार्यकाळात परीक्षा विभागाची कामगिरी खालावली होती. अखेर गेल्या आॅक्टोबर महिन्यात सामान्य प्रशासन शाखेचे उपकुलसचिव प्रशांत मोहिते यांच्याकडे परीक्षा विभागाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला होता. त्यांनी हिवाळी परीक्षांमध्ये अतिशय चांगली कामगिरी करुन दाखविली. परीक्षा विभागात उन्हाळी परीक्षांची धामधूम सुरू आहे. इतिहासात प्रथमच प्रात्यक्षिक परीक्षांसाठी आगावू वेळापत्रक जाहीर करण्यात आले. सर्व काही सुरळीत चालले आहे असे वाटत असतानाच मोहिते यांनी आपल्याला अतिरिक्त कार्यभारातून मुक्त करण्यात यावे, अशी विनंती केल्याने विद्यापीठ प्रशासन अडचणीत सापडले आहे.
यासंदर्भात प्रशांत मोहिते यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या घडामोडीस होकार दिला. परीक्षा विभागाचे कार्यालय एलआयटी परिसरात आहे तर सामान्य प्रशासन विभागाचे काम प्रशासकीय इमारतीतून चालते. दोन्ही विभाग अतिशय महत्त्वाचे असल्याने दोन्ही ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक होते. यात प्रचंड धावपळ होत होती. त्यामुळे अतिरिक्त प्रभारातून मुक्त करण्याची विनंती केली, असे त्यांनी सांगितले.(प्रतिनिधी)


परीक्षा येणार अडचणीत
दरम्यान, प्रभारी कुलगुरूंनी ही विनंती मान्य केली की नाही याबाबत माहिती मिळू शकली नाही. परंतु यामुळे आता प्रभारीपद कुणाला द्यावे हा विद्यापीठासमोर प्रश्न पडला आहे. पूर्णवेळ परीक्षा नियंत्रकांच्या निवडीसाठी विधीसभेच्या बैठकीच्या अगोदर मुलाखती होण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत उन्हाळी परीक्षांच्या सुरुवातीला विभागाला अधिकारी नसल्याने परीक्षांचे ताळतंत्र बिघडते की काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

कुलसचिव ‘कनेक्शन’?
मोहिते यांच्या या विनंतीमागे कुलसचिव ‘कनेक्शन’ असल्याची चर्चा विद्यापीठ वर्तुळात सुरू आहे. डॉ. अशोक गोमाशे हे ३१ मार्च रोजी पदावरून पायउतार होत आहेत. नवीन कुलगुरू निवडीपर्यंत पूर्णवेळ कुलसचिव नियुक्त होण्याची चिन्हे नाहीत. अशास्थितीत कुलसचिवपदाची अतिरिक्त जबाबदारी विद्यापीठातील वरिष्ठ उपकुलसचिवांकडे देण्यात येण्याची शक्यता आहे.

Web Title: In the face of the examination, the in-charge of the Controller of Examinations is on hand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.