प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांवर विश्वास ठेवता येत नाही
By Admin | Updated: October 31, 2014 00:51 IST2014-10-31T00:51:00+5:302014-10-31T00:51:00+5:30
प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांवर विश्वास ठेवता येऊ शकत नाही, असा युक्तिवाद आज बचाव पक्षाने अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. टी. सूर्यवंशी यांच्या न्यायालयात सुरू असलेल्या बहुचर्चित अक्कू यादव खून

प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांवर विश्वास ठेवता येत नाही
अक्कू यादव खून खटला: बचाव पक्षाचा युक्तिवाद
नागपूर : प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांवर विश्वास ठेवता येऊ शकत नाही, असा युक्तिवाद आज बचाव पक्षाने अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. टी. सूर्यवंशी यांच्या न्यायालयात सुरू असलेल्या बहुचर्चित अक्कू यादव खून खटल्याच्या सुनावणीदरम्यान केला.
बचाव पक्षाचे वकील अॅड. आर. के. तिवारी हे आपला युक्तिवाद करताना पुढे म्हणाले की, या खटल्यात चार प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांच्या साक्षी तपासण्यात आल्या आहेत. या साक्षीदारांपैकी पोलीस कॉन्स्टेबल दामोदर चौधरी आणि रवींद्र सूर्यवंशी यांनी घटनेच्या दिवशी अक्कू यादव याला न्यायालयात आणले होते.
दामोदर हा घटनेच्या वेळी न्यायालयाच्या चॅनल गेटजवळ उभा होता. चॅनल गेटजवळून न्यायालयाच्या आतील काहीही दिसत नसल्याचे त्याने आपल्या साक्षीत कबुल केले आहे. घटनेनंतर पोलीस आले तेव्हा तो सदर पोलीस ठाण्यात गेला होता. परंतु ठाण्यात त्याने तीन तास उशिरा तक्रार नोंदवली आहे. तो घटनास्थळावरील काही आरोपींना ओळखू शकला नाही. घटनेच्या वेळी काही आरोपींनी काही केले हे सिद्ध होत नाही.
दुसरा साक्षीदार पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र सूर्यवंशी हा अक्कूच्या जवळ होता. अक्कूवर हल्ला होत असताना तो बचाव करीत होता. न्यायालयात रक्त सांडले होते. परंतु सूर्यवंशीच्या कपड्यांवर रक्ताचा एकही डाग नव्हता. हे दोन्ही साक्षीदार घटनास्थळावरून पळून गेल्याने त्यांच्यावर विभागीय कारवाई झालेली आहे. त्यामुळे प्रत्यक्ष घटनेच्या वेळी हे दोन्ही साक्षीदार घटनास्थळी नव्हते, हे सिद्ध होते, असेही अॅड. तिवारी आपल्या युक्तिवादात म्हणाले.
अक्कू यादव याचे दोन भाऊ संतोष आणि युवराज यादव यांचे म्हणणे असे होते की, आम्ही घटना तुटलेल्या दरवाजातून पाहत होतो. युवराजने आपल्या उलटतपासणीत तुटलेल्या दरवाजातून आतमधील काही दिसत नव्हते, असे म्हटले आहे. यावरून हे दोन्ही साक्षीदार घटनेच्या वेळी घटनास्थळावर नव्हते हे सिद्ध होते. त्यामुळे आरोपींना संशयाचा फायदा देऊन निर्दोष सोडून द्यावे, असेही बचाव पक्षाने आपल्या युक्तिवादात म्हटले.
बचाव पक्षाचा युक्तिवाद संपला असून १ नोव्हेंबर रोजी सरकार पक्षाचा युक्तिवाद होणार आहे. न्यायालयात अतिरिक्त सरकारी वकील रवींद्र भोयर आणि बचाव पक्षाचे आणखी एक वकील अॅड. अशोक भांगडे उपस्थित होते. (प्रतिनिधी)